कोल्हापूर : मराठा आरक्षणासाठी अविरत लढणारे मनोज जरांगे-पाटील यांची येत्या १७ नोव्हेंबरला कोल्हापुरात सभा होणार आहे. सध्या मराठा आरक्षणाच्या नावाखाली काही समाजकंटक पैसे गोळा करत आहेत. असे पैसे मागणाऱ्यांना कोल्हापुरातील दसरा चौकात कोल्हापुरी चप्पलचा प्रसाद दिला जाईल, असा इशारा सकल मराठा समाजाच्यावतीने देण्यात आला. कोल्हापुरातील सभेसाठी जिल्ह्यातून दोन ते पाच लाख नागरिक येणार आहेत. त्यामुळे पोलीस अधीक्षकांशी चर्चा करूनच सभेचे ठिकाण निश्चित करण्यात येणार असल्याची माहिती सकल मराठा समाजाचे समन्वयक वसंतराव मुळीक यांनी शनिवारी पत्रकार परिषदेत दिली. शुक्रवारी (दि.१७) दुपारी दोन वाजता सभेस सुरुवात होईल. तत्पूर्वी, जरांगे-पाटील हे नर्सरी बागेतील राजर्षी छत्रपती शाहू महाराजांच्या समाधीचे दर्शन घेणार आहेत.मराठा समाजाला आरक्षण मिळवून देण्यासाठी जरांगे-पाटील यांनी तिसऱ्या टप्प्यातील आंदोलनाला सुरुवात केली आहे. त्यातूनच ते १७ नोव्हेंबरला कोल्हापुरात येऊन आरक्षणाची भूमिका मांडणार आहेत. या सभेला दोन ते पाच लाख नागरिक येणार आहेत. ही सभा दसरा चौकात घेण्याचे प्राथमिक नियोजन केले असले तरी सभेला होणारी गर्दी पाहता प्रशस्त ठिकाणी सभा घेण्यासाठी सकल मराठा समाजाचे पदाधिकारी पोलीस अधीक्षक महेंद्र पंडित यांची भेट घेणार आहेत. त्यानंतरच सभास्थळ निश्चित करण्यात येणार असल्याचे मुळीक यांनी सांगितले. उन्हाचा तडाखा लक्षात घेता भगवी टोपी, भगवे झेंडे, पाण्याची बाटली घेऊन सभेच्या ठिकाणी यावे. लाखोंच्या संख्येने नागरिक येणार असल्याने पार्किंगची व्यवस्था मंगळवारी जाहीर केली जाणार असल्याचे मुळीक म्हणाले. सभेला होणारी गर्दी लक्षात घेता दहा स्क्रिन ठिकठिकाणी लावण्यात येणार आहेत. या सभेसाठी शाहू छत्रपती यांच्यासमवेत चर्चा केली जाणार असल्याचे मुळीक यांनी स्पष्ट केले.
मनोज जरांगेंच्या सभेच्या नावाखाली पैसे मागाल तर मिळेल कोल्हापुरी चप्पलेचा प्रसाद, सकल मराठा समाजाचा इशारा
By पोपट केशव पवार | Published: November 11, 2023 5:22 PM