निंगाप्पा बोकडे
चंदगड : तिलारी घाटात (ता. चंदगड) बुधवारी (दि.२८) मध्यरात्री काही तरुणांना वाघाचे दर्शन झाल्याचा व्हिडिओ सर्वत्र व्हायरल होत आहे. मात्र हा वाघ नसून बिबट्या असल्याचे या स्पष्ट दिसत आहे. दरम्यान, प्रवाशांनी खबरदारी घेऊन घाटातून प्रवास करावा, असे आवाहन वनविभागाने केले आहे.चंदगड तालुक्यातील किरमटेवाडी येथील अनिल किरमटे, ज्ञानेश्वर धुरी, महेंद्र किरमटे, शुभम किरमटे, आकाश मासरणकर, अनिकेत किरमटे हे तरुण बुधवारी रात्री गोव्यातून गावाकडे परत येत होते. दरम्यान तिलारी घाटात त्यांना वाघ दिसला. घाटातील एका वळणावर रस्त्याच्या एका कडेला तो निवांत बसला होता. गाडीचा प्रकाशझोत पडल्यानंतर तो उठून उभा राहिला आणि काही वेळातच जंगलात पुढे निघून गेला. याचा व्हिडिओ सर्वत्र व्हायरल झाला आहे. मात्र हा वाघ नसून बिबट्या असल्याचे स्पष्ट दिसत आहे.मात्र, यापूर्वीही तिलारी घाटात वाघाचे वास्तव असल्याचे समोर आले आहे. अनेकदा त्याचे फोटो वनविभागाच्या कॅमेऱ्यात कैद झाले आहेत. मात्र, पर्यटकांना दिसलेला वाघ नसून तो बिबट्या असल्याचे स्पष्ट होते.