प्रगती जाधव-पाटील --सातारा‘कोणी घर देता का घर,’ असा सवाल ‘नटसम्राट’ अप्पा बेलवलकर यांना पडला होता. अगदी तसाच सवाल साताऱ्यातील चिमुरड्यांना पडला आहे. कोणी खेळायला जागा देता का जागा, अशी आर्त हाक ही चिमुकली मारत आहेत. घराच्या परिसरात शांततेचा भंग आणि तोडफोड होते या कारणामुळे मुलांच्या खेळांवर बंधने आल्याची धक्कादायक माहिती सर्वेक्षणातून मिळाली आहे.पेन्शनरांचे शहर म्हणून अवघ्या महाराष्ट्राने गोंजारलेले सातारा शहर दुपारच्या वेळेत तसेच शांतच असते. चाकरमानी नोकरीला, विद्यार्थी शाळेत आणि ज्येष्ठ विश्रांती घेत असल्यामुळे घर आणि परिसर तुलनेने शांतच राहतो; पण उन्हाळ्याच्या सुट्या लागायला अवघ्या काही दिवसांचा अवकाश असताना आता मुलांना खेळायला जागा मिळविण्यासाठी वणवण सुरू झाली आहे. मोठ्या शहरांप्रमाणेच साताऱ्यातही आता अपार्टमेंटची संख्या चांगलीच वाढत आहे. अपार्टमेंटमध्ये राहत असल्याने घरासमोरील अंगण लुप्त झाले आहे. त्यामुळे अपार्टमेंटमध्ये राहणाऱ्या मुलांना पार्किंगमध्ये, शेजारील बोळात किंवा मग रस्त्यावर खेळ मांडावा लागत आहे. पण रस्त्यावरील खेळ धोकादायक असल्याने पालक या मुलांना घरातच कोंडून घालत असल्याचे चित्र घराघरांत पाहायला मिळत आहे. मुलं एकलकोंडी आणि मोबाईल वेडी झालेत, अशी ओरड करणाऱ्या समाजाने दोन महिन्यांच्या शाळेच्या सुटीत या मुलांना त्यांच्या हक्काची जागा देणे गरजेचे बनले आहे. वर्षभर घर, अभ्यास, शिकवणी आणि शाळा या चौकोनात मुलं वर्षभर अडकलेले असतात. आपल्या काळी उन्हाळी सुट्टीत जी काही धम्माल होती ती धम्माल पुढच्या पिढीकडे हस्तांतरीत करायची असेल तर प्रत्येकाने काच तुटेल किंवा दंगा होईल या सबबी सोडून मुलांना मिळेल ती सुरक्षित जागा मुलांना खेळायला दिली पाहिजे. (प्रतिनिधी)मुलांचा खेळ का नको घरा शेजारी ?घराशेजारी कितीही मोठी जागा असली तरीही शेजाऱ्यांच्या ओरडण्याने मुलांना खेळता येत नाही. मुल क्रिकेट खेळतात. बॅटने चेंडू फटकवला की तो कुठे जाईल याचा नेम नाही. साताऱ्यातील यादोगोपाळ पेठेत एका अपार्टमेंटच्या खाली पाडव्याची सुटी असल्याने मुलं खेळत होती. खेळताना षटकार ओढण्याच्या नादात फलंदाजाचा चेंडू अपार्टमेंटच्या दुसऱ्या मजल्यावरील खिडकीलाच ‘बोल्ड’ केले. आता बोलायचे कोणाला आणि भरपाई मागायची कोणाकडे, असा प्रश्न सर्वांसमोर उभा राहिला. शेवटी फ्लॅट मालकांनीच नवीन काच बसवली; पण पुन्हा इथे क्रिकेट खेळायचं नाही ही अट घातली. घराशेजारील जागाच का?खेळ खेळताना आपल्या घराशेजारी असणाऱ्या रिकाम्या जागेत किंवा मैदानावरच खेळायला मुलांना फार आवडते. खेळताना तहान लागली, भूक लागली, चप्पल तुटली, खेळताना काही लागले किंवा काहीही गैरसोयी झाली तरी लगेच दुसऱ्या मिनिटाला घरात जाणे शक्य असते, म्हणून मुलं घराशेजारी असलेल्या जागेत खेळण्यास प्राधान्य देतात. मुलांबरोबरच पालकांनाही मुलं नजरेच्या टप्प्यात खेळत असतील तर ते अधिक सुरक्षित वाटते. जागा लहान असली तरी मुलांचे नजरेसमोर असणं महत्त्वाचं असल्य्ााचे पालक मानतात.का कोंडून ठेवतात त्यांना घरातचअपार्टमेंटमध्ये राहणाऱ्या बहुतांश घरांमध्ये मुलांना दुपारी कुठेच बाहेर पाठवले जात नाही. सुटी असली तरीही घरात टीव्ही किंवा मोबाईलमध्ये डोकं खुपसून बसणं ही त्यांच्यावरची सक्ती. आपलं पोर घराबाहेर जाऊन खेळू लागलं तर अपार्टमेंटमधील लोक नावं ठेवतील ही सामाजिक भीती पालकांना असते. म्हणूनच मुलांच्या नैसर्गिक वाढीच्या वयात त्यांच्यावर घरात बसण्याची वेळ येते. याबरोबरच मुलं जर कडकडी असतील तर घराबाहेर जाऊन काही वाढीव उद्योग नको, या भूमिकेतूनही मुलांना घरातच कोंडून ठेवले जाते.
कधी रस्त्यावर तर कधी गल्लीत रंगतोय मुलांचा खेळ...!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 10, 2017 11:42 PM