आज कागल येथील प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी यांच्या न्यायालयात आरोपी वैद्य याला हजर केले असता, विजया काटकर यांनी त्याला पाच दिवसांची पोलीस कस्टडी सुनावली. वरदचा खून आपणच केला असल्याची कबुली आरोपी वैद्य याने पोलिसांना दिली आहे. पण हा खून का केला, हे मात्र अद्याप त्याने सांगितले नसल्याचे पोलिसांनी सांगितले. हा आरोपी कोल्हापूर येथील वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या देखरेखेखाली कस्टडीमध्ये आहे. पण शुक्रवार आणि शनिवारीही सावर्डे बुद्रुक आणि सोनाळी येथे कायदा व सुव्यवस्था निर्माण होण्याची परिस्थिती निर्माण झाल्याने तपासकामाला गती मिळाली नसल्याचे वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी सांगितले.
दरम्यान, शनिवारी सायंकाळी पत्रकारांबरोबर चर्चा करताना डीवायएसपी आर. आर. पाटील यांनी तपास करताना सर्व बाजूनी तपास सुरू आहे. या सर्व प्रकरणामध्ये वरिष्ठ अधिकाऱ्यांनी पूर्णपणे लक्ष घातले आहे. आरोपीला पाच दिवस कस्टडी मिळाली असून, यामध्ये आपण वरिष्ठांच्या मार्गदर्शनानुसार पुराव्यानिशी तपास पूर्ण करण्याचा प्रयत्न करणार असल्याचे सांगितले. पत्रकारांनी आज दिवसभर सावर्डे आणि सोनाळी गावातील नागरिकांनी हा खून अंधश्रद्धेतून झाला आहे, असे ठाम मत व्यक्त केले आहे आणि पोलिसांवर दबाव आहे, अशी चर्चा सुरू आहे, हे खरे आहे का? असा प्रश्न उपस्थित केल्यावर पोलीस अधिकाऱ्यांनी कोणतीच प्रतिक्रिया दिली नाही.
तसेच मृत वरदच्या आईलाही तपासासाठी दोन-तीनवेळा आपण बोलावले, यावर या कुटुंबाने आक्षेप घेतला आहे. यावर तपासासाठी आम्ही सर्व शक्यता गृहीत धरून पुढे जात आहोत. सर्वांनाच आम्ही तपासासाठी बोलावतो आहे. सर्वांनी सहकार्य करावे, असे आवाहनही पोलिसांनी केले. दरम्यान, आज दिवसभर अतिरिक्त पोलीस अधीक्षक तिरुपती काकडे, डीवायएसपी आर. आर. पाटील, गडहिंग्लज विभागाचे डीवायएसपी गणेश इंगळे, सपोनि विकास बडवे, सहा. पोलीस निरीक्षक किशोरकुमार खाडे आदी वरिष्ठांनी सावर्डे, सोनाळी येथे भेटी दिल्या.