कोल्हापूर : ‘आली गं बाई आज गवर माहेराला, नव्या नवरीचा साज तिला घाला, आमची गौराई सजवा, शालू पैठणी नेसवा, हिरे माणकांचा हार गळा घालून बसवा’....आपल्या सोनपावलांनी घराघरांत सुख-समृद्धीचे माप ओलांडत रविवारी लेक गणपतीच्या शेजारी माता गौराई विराजमान झाली. याच दिवसाचा मुहूर्त साधून नेमका पावसाने जारे धरला तरी या सरी झेलत मुली, सुवासिनींनी हा सणाचा आनंद द्विगुणित केला. भक्तांच्या घरी गणपती बाप्पा आल्यानंतर दोन दिवसांनी आई गौराईचे आगमन होते. पहिले दोन दिवस बाप्पांचा पाहुणचार झाला, तोपर्यंत रविवारी घराघरांत गौराईच्या आगमनाची लगबग सुरू झाली. सकाळी ९ नंतर गौरी आवाहनाचा मुहूर्त होता. त्याआधी सकाळपासूनच मिश्र पालेभाज्या, मिश्र तिखट भाजी, वडी, भाकरी हे पारंपरिक पदार्थ बनवण्यात आले. एकीकडे या सुग्रास जेवणाची तयारी सुरू होती. दुसरीकडे गौराई घरात आणण्यासाठी सुवासिनींची लगबग सुरू होती.
काठापदराच्या ६ वार नऊवारी साड्या, गळ्यात मंगळसूत्र, नेकलेस, कानातले, केसांचा अंबाडा आणि त्यात माळलेला गजरा असा साजश्रुंगार केलेल्या सुवासिनींचे आणि मुलींचे रूप अधिकच खुलून दिसत होते. पाण्याने भरलेले कलश घराजवळच्या पाणवठ्याच्या ठिकाणी नेऊन त्यात गौरीचे डहाळे घालण्यात आले. समोर पाच खडक ठेवून त्याला हळद-कुंकू लावले. गणपतीची आणि देवीची आरती झाल्यानंतर मध्यभागी हे कलश ठेवून महिलांनी झिम्मा-फुगडीचा फेर धरला. येथे गौरीचे पूजन करून दारात दहीभाताने तिची नजर काढण्यात आली. तिचे औक्षण करून उजव्या पायानं घरात येताना प्रत्येक पावलावर गौरी आली का अशी विचारणा केली जाते. आली म्हटलं की काय लेवून आली, पिवळं पितांबर लेवून आली, काय घेऊन आली. भाजी भाकरी घेऊन आली, सुख-समृद्धी घेऊन आली, माणिक मोती घेऊन आली... विद्याबुद्धी घेऊन आली, धनधान्य घेऊन आली असं सांगत घरभर तिचा वावर होतो.
गौरीच्या प्रत्येक पावलांनी घरात सुखसमृद्धी नांदते अशी या परंपरेमागची भावना आहे. यानंतर गणपतीच्या शेजारी गौराईची प्रतिष्ठापना करण्यात आली. काही घरांत फक्त गौरीचे डहाळे, काही घरांत पानांचे, काही कुटुंबांत तांब्याचे, तर अनेक कुटुंबांत मुखवटे आणि उभ्या मूर्ती पूजल्या जातात. आपआपल्या परंपेरनुसार सायंकाळी गौरी सजवण्यात आली. देवीचा साजश्रृंगार करण्यात आला.
---
पावसाचा अडथळा...
गणेशचतुर्थीला उघडीप दिलेल्या पावसाने गौराईच्या आगमानाचा नेमका मुहूर्त धरला. रविवारी सकाळपासूनच पावसाच्या सरी कोसळत होत्या. सुरुवातीला बारीक आणि अधे मध्ये जोरदार सरी कोसळत होत्या. त्यामुळे दुपारी एक दीड वाजेपर्यंत महिलांना घराबाहेर पडता आले नाही. मध्येच पाऊस कमी होत होता तेंव्हाच पूजा लवकर आटोपून घेण्यात आली.
---
गौरी गीतांनी रंगली रात्र
गौरी-गणपतीच्या सणाला पारंपरिक झिम्मा फुगडीचे खेळ खेळले जातात. आजही ग्रामीण भागच काय शहरातही या खेळांची महिला-मुलींमध्ये क्रेझ आहे. त्यामुळे भलेही अगदी नीटनेटक्या पद्धतीने खेळता आले नाही तर आपल्या पद्धतीने महिला याचा आनंद लुटतात. गाणी येत नसतील, तर त्यासाठी यूट्युबवरील गाण्यांचा आधार घेतला जातो.
फोटो फाईल स्वतंत्र