कोल्हापूर : धनगर समाजाच्या अनुसूचित जमाती आरक्षणाच्या अंमलबजावणीसाठी महाविकास आघाडी सरकार सकारात्मक आहे. लवकरच या संदर्भात योग्य निर्णय घेतला जाईल, असे आश्वासन पालकमंत्री सतेज पाटील यांनी दिले.आरक्षणाची अंमलबजावणी करा, या मागणीचे निवेदन जिल्हा काँग्रेस कमिटीत पालकमंत्री पाटील यांना कोल्हापूर जिल्हा धनगर समाज समन्वय समितीच्या शिष्टमंडळाने दिले.धनगर समाजाच्या आरक्षणाच्या अंमलबजावणीसाठी सर्वच लोकप्रतिनिधी अनुकूल आहेत. या संदर्भात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याशी चर्चा झाली आहे.महाविकास आघाडी सरकार हे धनगर समाजाला न्याय देणार असल्याचे पालकमंत्री पाटील यांनी सांगितले. जिल्ह्यातील धनगर समाजातील सर्व संघटना आरक्षणाच्या मुद्द्यावर एकत्र आल्या आहेत. त्यांनी जिल्हा धनगर समाज समन्वय समितीची स्थापना केली आहे.आरक्षणाची अंमलबजावणी तत्काळ करा, अशी समितीची प्रमुख मागणी असल्याचे राजेश तांबवे, बबनराव रानगे यांनी सांगितले.
यावेळी प्रा. राजेंद्र कोळेकर, शंकर पुजारी, कृष्णात पुजारी, मच्छिंद्रनाथ बनसोडे, बयाजी शेळके, छगन नांगरे, लक्ष्मण करपे, राघू हजारे, महादेव सणगर, तम्मा शिरोले, डॉ. संदीप हजारे, विकास घागरे, प्रकाश गोरड, बाबूराव रानगे, राजेश बाणदार, खानदेव पिराई, प्रल्हाद देबाजे, संभाजी पिराई, आदी उपस्थित होते.