उदगाव/शिरोळ : पावसाचा जोर मंदावला आहे ही बाब समाधानकारक असून किमान होणारे मोठे नुकसान टाळण्यासाठी दिलासादायक आहे. आताच्या परिस्थितीमध्ये महापुरामुळे पूर बाधित गावांमध्ये जे नुकसान झालेले आहे, अशा नुकसानग्रस्त पूर बाधितांच्या नुकसानीचे पंचनामे पूर ओसरताच तातडीने करून घ्यावेत, अशा सूचना आपण महसूल व कृषी विभागाला दिल्या आहेत, अशी माहिती आरोग्य राज्यमंत्री राजेंद्र पाटील-यड्रावकर यांनी उदगाव येथे दिली.
महापुराचे संकट प्रत्येक वर्षी येणार असेल तर यावर कायमस्वरूपी उपाय शोधण्यासाठी शासन या संकटाकडे गांभीर्याने पाहत आहे, असेही राज्यमंत्री यड्रावकर यांनी यावेळी सांगितले.
पूर्ण व अंशता बाधित होणाऱ्या प्रत्येक गावांमधील गावकुसाबाहेरील वंचित उपेक्षित घटकांना महापुराचा सर्वात मोठा फटका बसत आहे. यापुढच्या काळात अशा घटकांसाठी कायमस्वरूपी उपाययोजना करण्याबाबत शासन प्राधान्याने काम करेल असेही राज्यमंत्री -यड्रावकर यांनी सांगितले. दरम्यान, शिरोळ येथील पद्माराजे विद्यालयांमध्ये स्थलांतरित झालेल्या पूर बाधित नागरिकांची भेट घेत त्यांच्याशी संवाद साधला व नुकसानीबाबत शासनाकडून मदत दिली जाईल, अशी ग्वाही उपस्थितांना दिली.
फोटो ओळ : शिरोळ येथील श्री पद्माराजे विद्यालयातील छावणीमध्ये राज्यमंत्री राजेंद्र पाटील-यड्रावकर यांनी पूरग्रस्तांशी संवाद साधला.