कोल्हापूर : महापुरामध्ये आपदा सखींनी केलेल्या कामाने राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा विजया रहाटकर प्रभावित झाल्या. त्यांच्या कार्याचा गौरव करून लवकरच आपदा सखींना घेऊन पंतप्रधान नरेंद्र मोदींना भेटू, अशी ग्वाही त्यांनी दिली.पूरग्रस्त भागाची पाहणी करून पूरग्रस्तांशी संवाद साधण्यासाठी जिल्हा दौऱ्यावर आलेल्या विजया रहाटकर यांची आपदा सखींनी शासकीय विश्रामगृह येथे भेट घेतली. यावेळी त्या बोलत होत्या. यावेळी जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी प्रसाद संकपाळ उपस्थित होते.जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण अंतर्गत तयार करण्यात युवतींच्या ‘आपदा सखी’ या पथकाने या महापुरामध्ये जोरदार कामगिरी केली. त्याची माहिती संकपाळ यांनी रहाटकर यांना दिली. पूरपरिस्थितीत आपदा सखींनी केलेल्या कामाने रहाटकर प्रभावित झाल्या.
देशातील पहिले पथक आणि ते ही कोल्हापूर जिल्ह्यातील असल्याचा खूप आनंद आहे, अशा शब्दांत रहाटकर यांनी आपदा सखींचे कौतुक केले. तसेच ही बाब पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासमोर मांडू, यावेळी आपदा सखींनाही सोबत घेऊन जाऊ, अशी ग्वाही रहाटकर यांनी दिली.यावेळी आपदा सखी शुुभांगी घराळे, वैष्णवी कांबळे, शामल कांबळे, सानिका शिंदे, शिवानी जाधव, अश्विनी काटाळे, श्रद्धा पाटील, दीपाली कांबळे, रमेजा जमादार, कोमल कांबळे, साक्षी कांबळे, आदी उपस्थित होत्या.