कोल्हापूर : ती सज्ञान असली तरी कुमारी माता. कोल्हापूरच्या वेशीवरील सीमाभागातील गावातील. बाळंतपणासाठी ती सीपीआर रुग्णालयात दाखल झाली. नैसर्गिक प्रसूती झाली. गुटगुटीत बाळ जन्माला आले; परंतु ते जन्माला येताच चक्क आईच म्हणाली, ‘डॉक्टरसाहेब, मला नको ते बाळ... त्याचा सांभाळ मी कसा करू?...’ या बाळाचे नक्की काय करायचे असा प्रश्न गेले नऊ दिवस सीपीआर प्रशासनाला भेडसावत होता. गुरुवारी सायंकाळी त्यातून मार्ग निघाला. आता हे बाळ आवश्यक सोपस्कार करून बालकल्याण संकुलाकडे सुपूर्द करण्यात येणार आहे.परिस्थितीपुढे माणूस अनेकदा पराभूत होतो, तसाच प्रसंग या मातेवर ओढवला असून, नऊ महिने पोटात सांभाळलेला हा मायेचा गोळा दुसऱ्याच्या स्वाधीन करण्याची वेळ तिच्यावर आली आहे. ही महिला स्वत:हून ४ फेब्रुवारीस‘ सीपीआर’मध्ये दाखल झाली.
लगेच दुसऱ्या दिवशी तिची व्यवस्थित प्रसूती झाली. त्यामुळे तीन दिवसांनंतर बाळ-बाळंतिणीची तपासणी केल्यानंतर तिला डिस्चार्ज देण्याची प्रक्रिया सुरू झाली; परंतु तिने बाळाला स्वीकारण्यास नकार दिल्यावर बाळाची जबाबदारी घ्यायची कुणी असा प्रश्न तयार झाला.
निपाणी पोलिसांना कळविण्यात आले. त्यांनी येऊन जाबजबाब घेतला. परंतु प्रसूती ‘सीपीआर’ला झाल्यामुळे त्यांनी हात वर केले. मग लक्ष्मीपुरी पोलिसांना कळविण्यात आले. त्यांनी घटना मूळची कर्नाटकातील असल्याने आम्ही काय करू? असा पवित्रा घेतला. संबंधित तरुणीच्या वडील व बहिणीला बोलावून घेतले; परंतु त्यांचीही ‘बाळ नको’ अशीच भूमिका.
बालकल्याण संकुलात दाखल झालेल्या बाळाची जबाबदारी संकुल स्वीकारते; परंतु पालक असताना मूल स्वीकारण्यात संस्थेलाही अडचण आली. गुरुवारी दुपारी ‘सीपीआर’मधील एका बैठकीत हा प्रश्न समाजसेवा विभागाच्या अधीक्षकांकडून मांडण्यात आला. त्यावर बरीच चर्चा झाली.
त्यानंतर ‘सीपीआर’ प्रशासनाने आईच्या संमती व स्वाक्षरीसह बाळ नको असे लेखी पत्र द्यायचे व या बाळाची जबाबदारी बालकल्याण संकुलाकडे सुपूर्द करायची असे ठरले. ही प्रक्रिया करण्यात येणार असून हे त्या मातेला असाहाय्यपणे नको असलेले बाळ संकुलाच्या शिशुगृहामध्ये दाखल होईल. रीतसर कायदेशीर दत्तक प्रक्रिया राबवून त्याचे नंतर पुनर्वसन होईल.