(चंद्रकांत पाटील व हसन मुश्रीफ यांचे फोटो वापरावेत)
लोकमत न्यूज नेटवर्क
कोल्हापूर : ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांच्यासंबंधीचा प्रश्न विचारताच भाजपचे प्रदेशाध्यक्ष आमदार चंद्रकांत पाटील यांनी मंगळवारी येथे झालेल्या पत्रकार परिषदेत चक्क दोन हात जोडले. ते थोरच आहेत, त्यांच्याबद्दल मी काय बोलणार, अशी प्रतिक्रिया त्यांनी व्यक्त केली. आमदार पाटील व मंत्री मुश्रीफ यांच्यात वारंवार राजकीय टीका-टिप्पण्णी होते त्यामुळे पाटील यांनी हात जोडताच पत्रकारात हास्याची लकेर उमटली.
हिंमत असेल तर भाजपने सरकारवर अविश्वास ठराव आणावा, असे मंत्री मुश्रीफ म्हणत असल्याचे प्रदेशाध्यक्ष पाटील यांच्या निदर्शनास आणून दिल्यावर त्यांनी अगोदर हात जोडले व विधानसभा अध्यक्षांच्या निवडणुकीत त्यांना ताकद दाखविण्याची संधी होती ती का घालवली, अशी विचारणा केली.
‘गोकुळ’च्या निवडणुकीत भाजप सत्तारुढ आघाडीसोबतच असेल हे स्पष्टच असल्याचे प्रदेशाध्यक्ष पाटील यांनी सांगितले. ‘गोकुळ’मध्ये गेली अनेक वर्षे दोन ध्रुवामध्ये राजकारण चालते. तिथे नव्याने काही गडबड करण्याची गरज नाही. त्यामुळे सत्तारुढ आघाडीचे नेते माजी आमदार महादेवराव महाडिक, माजी खासदार धनंजय महाडिक व आमदार पी. एन. पाटील यांच्याशी चर्चा करावी, असे जिल्हाध्यक्ष समरजित घाटगे यांना सुचविले आहे. गेल्या पाच वर्षांत भाजपने सहकार क्षेत्रातही भक्कम बांधणी केली आहे. आमचेही चांगल्या संख्येने ठराव आहेत. त्यामुळे त्या प्रमाणात ‘गोकुळ’मध्ये आम्हाला प्रतिनिधित्व मिळायला हवे, असे त्यांनी स्पष्ट केले.
जिल्हा बँकेत पॅनेल करणार..
जिल्हा बँकेच्या गेल्या निवडणुकीत भाजप लढला होता. त्यावेळी पतसंस्था गटातून आमचे अनिल पाटील विजयी झाले. बँकेच्या आगामी निवडणुकीतही आम्ही पॅनेल करणार आहोत, असे प्रदेशाध्यक्ष पाटील यांनी जाहीर केले.