या पाेस्टर्समुळे मतदार क्षेत्रात खळबळ उडाली. चाैका-चाैकात अन् रस्ताेरस्ती ते पाेस्टर पाहून लाेक आश्चर्य व्यक्त करत हाेते.
एक दुसऱ्यास त्यावरचा मजकूर माेठ्याने वाचून ऐकवित हाेते.
‘साेपानराव पाटील... मुख्यमंत्री’
काय कमाल आहे बुवा! काल रात्रीपर्यंत तर मुख्यमंत्र्यांनी राजीनामा दिलेला नव्हता! मग साेपानराव मुख्यमंत्री कसे अन् कधी झाले? सत्ताधारी पक्षातील आमदारांनी त्यांना आपला नेता म्हणून कधी निवडले, अन् साेपानरावांनी मुख्यमंत्रिपदाची शपथ केव्हा घेतली? सत्तारूढ पक्षांमध्ये अंतर्गत मतभेद तर झाले नसतील? त्यामुळे पक्षात फूट पडून हे महाभारत तर घडले नसेल?
मतदार आपआपसात कुजबुजत हाेते. एक दुसऱ्याला प्रश्न विचारीत हाेते; पण कुणाजवळ याचे उत्तर नव्हते. या गाेंधळलेल्या वातावरणात विराेधी पक्षातले लाेक हाेतेच, त्याबराेबरच साेपानराव यांच्या पक्षातील अन् गटातील विराेधकसुद्धा सामील झाले हाेते.
विराेधी पक्षासाठी तर ही सुसंधी अकल्पितपणे हाती आली हाेती. त्यांनी या घटनेची साग्रसंगीत वार्ता फाेन, माेबाईल, ई-मेलद्वारे मुंबईला मा. मुख्यमंत्र्यांच्या कानी पाेहाेचविली. त्याचप्रमाणे संदेशात भर जाेडून हेही सांगितले की, ‘सर, साेपानराव आता आपले ‘प्रतिस्पर्धी’ बनले आहेत.’
मा. मुख्यमंत्र्यांचा यावर विश्वास बसला नाही, पण त्यांना वास्तव कळावे यासाठी विराेधी पक्षातील काहीजणांनी ‘ते’ पाेस्टरच फॅक्सद्वारे मा. मुख्यमंत्र्यांकडे पाठविले. पाेस्टरवर छापण्यात आलेला मजकूरसुद्धा त्यांच्याकडे पाठविण्यात आला. पण पाेस्टरवरील खराब, अस्पष्ट प्रिंट वगळता ‘साेपानराव... मुख्यमंत्री’ हे ठळक अक्षरातील शब्द मात्र स्पष्ट दिसत हाेते. परंतु, साेपानराव व मुख्यमंत्री यांच्या नावाच्या मध्येसुद्धा काहीतरी छापलेले हाेते, पण ते खूपच अस्पष्ट, अंधूक असल्यामुळे वाचता येत नव्हते.
या सर्व गदाराेळामुळे मा. मुख्यमंत्रीसुद्धा आश्चर्यचकित झाले. ‘अखेर काय पाहिजे असेल? या *** खाेराला? ‘त्यांनी स्वत:लाच मनातल्या मनात प्रश्न विचारला. साेपानरावांना मंत्रिपद बहाल करण्याच्या त्यांच्या निर्णयाबद्दल त्यांना आता पश्चाताप वाटू लागला. ‘राजकारणात कुणीही कुणाचा मित्र नसताे, अन् कायम शत्रूही नसताे तर...?’
मा. मुख्यमंत्र्यांनी साेपानरावांची ही आगळिक पक्षाच्या अनुशासन समितीसमाेर ठेवण्याचे तसेच साेपानराव यांना राजीनामा मागण्याचे मनाेमन निश्चित केले. त्यानुसार प्रधान सचिवांना साेपानराव यांना त्वरित फाेन जाेडून देण्याचा आदेश दिला. सचिवाने लगेच फाेन लावला.
सकाळचे साडेआठ वाजले हाेते. विधानसभा अधिवेशन समाप्तीनंतर आलेला थकवा अद्याप कमी झाला नव्हता. त्यामुळे साेपानराव आपल्या निवासस्थानी इतक्या उशिरापर्यंत झाेपलेले हाेते. त्यांना आतापर्यंत घाेंघावणाऱ्या वादळाचा तीळमात्रही सुगावा नव्हता. साहजिकच काही वेळानंतर उद्भवणाऱ्या प्रलयाचीसुद्धा सुतराम कल्पना नव्हती.
बराच वेळ वाजत राहिलेल्या फाेनच्या रिंगचा आवाज ऐकताच त्यांच्या झाेपेत व्यत्यय आला. कुरकुरतच साेपानरावांनी फाेन उचलला.
‘हॅलाऽव! काेण बाेलतंय?’
‘सर, मी वरिष्ठ सचिव बाेलताे आहे. मा. मुख्यमंत्री तुमच्याशी बाेलू इच्छितात...!’
मा. मुख्यमंत्र्यांचे नाव ऐकताच साेपानराव यांची झाेप पूर्णपणे उडाली. ते सावध अन् सतर्क हाेऊन उठून बसले.
फाेनवर मा. मुख्यमंत्री यांची गर्जना (डरकाळी) साेपानराव यांच्या कानावर आली. पाठाेपाठ शब्दांचा वर्षावसुद्धा...!
‘साेपानराव, हा काय तमाशा आहे?’
वीज कडाडल्याचा भास साेपानरावांना झाला. काही तरी चूक आपल्याकडून घडली असावी, अशी त्यांना शंका आली. चक्कर येत आहे, असे वाटल्याने त्यांनी स्वत:ला सावरून घेतले.
थरथरत्या आवाजात साेपानराव मुख्यमंत्र्यांना म्हणाले, ‘माय-बाप सरकार! माझ्याकडून काही गुन्हा किंवा चूक घडली असल्यास माफी असावी. पण अजून माझ्याकडून काय चूक झाली असावी, हे काही मला अद्याप समजलेले नाही!’
इतक्यात फाेनवरून मुख्यमंत्र्यांचा आवाज ऐकू आला. ‘साेपानराव, तुम्ही सगळीकडे जी पाेस्टर्स लावली आहेत ती तत्काळ हटवा अन् लगेच तुमचा राजीनामा दाखल करा; नसता पक्षातूनसुद्धा तुमची हकालपट्टी करावी लागेल...!’ लागाेपाठ फाेन आपटल्याचा आवाज आला.
आता चकित हाेण्याची पाळी साेपानरावांची हाेती. म्हणजे हा सगळा गाेंधळ त्या पाेस्टर्समुळे झालेला दिसताे!’ डाेके दाबून धरून ते मटकन खाली बसले.
‘आपल्या नशिबात काय ‘वाढणं’ समाेर येईल कळत नाही. मुख्यमंत्र्यांच्या वाक्ताडनावरून आता मंत्रीपद, शासकीय निवासस्थान, लाल दिव्याची गाडी, सुरक्षारक्षक, साऱ्या सुख-साेयींना मुकावे लागणार असे दिसते.’