मुंबईला पाेहाेचण्यास त्यांना आणखी ५-६ तास लागणार हाेते. विचारांच्या तंद्रीत आजपर्यंतचा जीवनपट आठवत हाेता.
गावाकडे बांधलेल्या भव्य प्रासादतुल्य बंगला, समाेर प्रशस्त व्हरांडा, जिथे भेटीस येणाऱ्यांसाठी बसण्याकरिता वेताच्या खुर्च्या मांडलेल्या हाेत्या. व्हरांड्याच्या पुढे हिरवी लाॅन, फुलांच्या कुंड्या, रेखीव आकारांची झाडे, रंगीत प्रकाशझाेत फेकणारा कारंजा, साेपानरावांच्या कलादृष्टीची ओळख पटवून देत हाेते.
लाॅनच्या कडेने गेटपर्यंत क्राँक्रीटचा पक्का रस्ता, जवळ विसावलेली लाल दिव्याची सरकारी गाडी अन् गेटवरचा स्टेनगनधारक सुरक्षारक्षक हे सारे वैभव आठवताच त्यांचा गळा दाटून आला. आता या वैभवाला मुकावे लागणार! या विचाराने त्यांना अंधारून आल्यासारखे झाले.
विचारांच्या तंद्रीत त्यांची गाडी शासकीय निवासस्थानासमाेर येऊन कधी थडकली हे त्यांना कळलेसुद्धा नाही. बाहेर व्हरांड्यातील वेताच्या खुर्चीवर आरामात बसलेल्या साेमनाथला पाहून साेपानराव त्याच्यावर एकदम भडकले.
‘अरे मूर्खा, तुझ्या ‘कामगिरी’मुळेच आज माझ्यावर हे संकट ओढवले आहे!’ रागाच्या भरात थरथर कापत ते साेमनाथवर बरसत हाेते.
‘काय झालंय नेताजी?’ साेमनाथने भीत भीत त्यांना विचारले. खरे तर ताे आता हाेता साेपानरावांकडून शाबासकी मिळविण्याच्या अपेक्षेने! पण इथे तर नेताजींचा मूडच अनावर झालेला दिसला.
‘अरे नालायका, तुझ्या त्या पाेस्टरमुळे मला माझे मंत्रीपद गमवावे लागत आहे. पांडेजींच्या शिफारशीमुळे विश्वासपूर्वक हे काम मी तुझ्यावर साेपविले; पण सगळाच अनर्थ झाला.’ साेपानरावांनी साेमनाथवर आराेपांचा भडिमार केला.
‘पाेस्टरमुळे साेमनाथ बुचकळ्यात पडला. ‘सर ते पाेस्टर तर खूप बढिया (उत्कृष्ट) छापले हाेते!’
‘तसेही असेल!’ साेपानरावांनी स्वत:ला सांभाळीत आदेश दिला, ‘जा अन् आधी त्या पांडेला बाेलावून घे. दाेघे मिळून लगेच तिथे जा अन् तिथले सर्व पाेस्टर्स काढून घेऊन या.’
साेपानरावांच्या आदेशाप्रमाणे दाेघांनी मिळून सर्व पाेस्टर्स त्यांनी काढून आणले. त्यावेळी उरलेले थाेडे पाेस्टरही त्यांनी साेबत आणले हाेते.
साेपानराव साेमनाथला म्हणाले, ‘आता तू हे पाेस्टर मला वाचून दाखव, म्हणजे त्यावर तू काय छापलेस ते मला समजेल!’
साेमनाथने पाेस्टरवरील मुख्यमंत्र्यासाेबत असलेले त्यांचे छायाचित्र दाखवीत पुढील मजकूर वाचण्यास सुरुवात केली.
‘साेपानराव... मुख्यमंत्री यांचे हार्दिक स्वागत.’
सर्व वास्तव समाेर आल्यानंतरही मा. मुख्यमंत्री आपल्यावर का नाराज असावेत, हे साेपानरावांना उमगले नाही. साेमनाथची या पाेस्टर निर्मितीत काही चूक नाही असे त्यांचे मत बनले. ते यासंबंधी साेमनाथला आणखी काही सांगणार इतक्यात त्यांच्याच पक्षातील; पण साेपानरावाचे छुपे विराेधक असलेले आमदार प्रतापराव माेरे समाेर आले. त्यांच्या हातात भला माेठा ‘बुके’ (स्वागत पुष्पगुच्छ) हाेता. माेरे यांना पाहताच साेमनाथने मात्र तिथून पाेबारा केला.
आमदार माेरे पुढे येऊन म्हणाले, ‘साेपानरावजी हार्दिक अभिनंदन!’
‘कशाबद्दल?’ साेपानराव यांनी चाचरत विचारणा केली.
‘आपण मुख्यमंत्री बनला आहात यासाठी! दुसरे काेणते कारण असणार? मानभावीपणे हसत आमदार माेरे यांनी टाळीसाठी साेपानराव यांच्या राेखाने हात पुढे केला.
‘चेष्टा? काय म्हणत आहात साेपानराव आपण? साऱ्या मतदारसंघात जाेरात चर्चा सुरू आहे. पाेस्टरमुळे राज्यभर ही वार्ता पसरली आहे.’
‘पुन्हा तेच ! पाेस्टर... पाेस्टर अन् पाेस्टर!’
साेपानराव यांचे माथे ठाणकू लागले अन् ते आमदार माेरे यांना म्हणाले, ‘भाई! ते पाेस्टर्स मी नव्हे तर विराेधी पक्षातील लाेकांनी किंवा आमच्याच पक्षातील असंतुष्ट गद्दारांनीच हा उपद्व्याप घडवून आणला आहे!’
नेमका वर्मी घाव बसल्याने आमदार माेरे हतप्रभ झाले. ‘वेळ येताच तुम्हाला कळून येईल की, काेण ‘गद्दार’ आहे!’ असे बडबडत निघून गेले.
माेरे निघून गेल्यानंतर साेपानराव साेमनाथला शाेधू लागले.