कोल्हापूर : बदलत्या काळानुसार उपचारपद्धतीत अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून कोल्हापूरचे वैद्यकीय क्षेत्र परिपूर्ण करण्यासाठी कोल्हापूर मेडिकल असोसिएशनने पुढाकार घ्यावा, असे आवाहन बिहारचे माजी राज्यपाल पद्मश्री डॉ. डी. वाय. पाटील यांनी शनिवारी केले.कोल्हापूर मेडिकल असोसिएशनतर्फे हॉटेल सयाजी येथे आयोजित ‘केएमएकॉन २०१६’ या वार्षिक अधिवेशनाच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते. यावेळी राजर्षी छत्रपती शाहू महाराज शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. जयप्रकाश रामानंद, डॉ. अमित मायदेव, पोटविकारतज्ज्ञ डॉ. आदर्श चौधरी, ‘केएमए’चे अध्यक्ष डॉ. प्रवीण हेंद्रे, डॉ. संतोष प्रभू, डॉ. अमोल कोडोलीकर, डॉ. ए. एम. शिर्के, आदी उपस्थित होते.डॉ. पाटील म्हणाले, अशा अधिवेशनाच्या माध्यमातून डॉक्टर्स व वैद्यकीय क्षेत्रातील विद्यार्थी यांच्यात अनुभव, वैचारिक देवाणघेवाणीची संधी प्राप्त होते. सध्या या क्षेत्रापुढे बदलत्या तंत्रज्ञानाचे आव्हान असून, डॉक्टरांनी अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून कोल्हापूरचे वैद्यकीय क्षेत्र परिपूर्ण बनवावे.दरम्यान, डॉ. मायदेव यांच्या वैद्यकीय क्षेत्रातील योगदानाबद्दल मान्यवरांच्या हस्ते त्यांचा सत्कार झाला. यावेळी मनोगत व्यक्त करताना ते म्हणाले, सध्या रुग्णांच्या नातेवाइकांकडून डॉक्टरांवरील हल्ले वाढत आहेत. त्यामुळे डॉक्टर व रुग्ण यांचा संवाद कायद्याच्या चौकटीत व्हायला हवा. डॉक्टरांनीही रुग्णांच्या प्रत्येक नोंदी काळजीपूर्वक ठेवाव्यात.डॉ. चौधरी म्हणाले, वैद्यकीय क्षेत्रातील व्यक्तींनी नेहमी अपडेट राहावे. प्रत्येक रुग्ण हा वेगळा असतो; त्यामुळे कोणत्याही निर्णयाप्रत पोहोचताना अनुभव व ज्ञान यांचा वापर करावा. त्यानंतर डॉ. सूरज पवार यांच्या कोल्हापूर कॅन्सर सेंटरमधील शस्त्रक्रियेचे प्रात्यक्षिक अधिवेशनस्थळी थेट प्रसारण करण्यात आले. त्याचा लाभ विविध भागांतून आलेल्या डॉक्टरांनी घेतला. यावेळी ‘केएमए फ्लॅश’ या स्मरणिकेचे प्रकाशन करण्यात आले. शनिवारी अधिवेशनात डॉ. गौतमी गणपुले, डॉ. अभिजित गणपुले, डॉ. साई प्रसाद, डॉ. संजय अग्रवाल, डॉ. किरण दोशी, डॉ. संतोष प्रभू, डॉ. वेदान्त राजशेखर, डॉ. अर्जुन आडनाईक, डॉ. आशिष नाबर हे तज्ज्ञ मार्गदर्शन करणार आहेत.
अत्याधुनिक तंत्रज्ञान वैद्यकीय क्षेत्रात वापरा
By admin | Published: October 22, 2016 11:16 PM