लोकमत न्यूज नेटवर्क
कोल्हापूर : जिल्ह्यासाठी पीक कर्जाचे वार्षिक उद्दिष्ट २ हजार ४८० असताना फेब्रुवारीअखेर २ हजार ५८४ कोटी इतके वाटप होऊन १०४ टक्के उद्दिष्ट्यपूर्ती झाली आहे. पीक कर्ज वाटपात जिल्हा राज्यात प्रथम आल्याबद्दल जिल्हाधिकारी दौलत देसाई यांनी मंगळवारी बँकांचे अभिनंदन केले. तसेच पंतप्रधान स्वनिधी योजना तसेच विविध महामंडळांचे प्रलंबित प्रस्ताव तत्काळ मार्गी लावावेत, बँकांनी आपला सीडी रेशो वाढवावा, अशी सूचनाही त्यांनी केली.
जिल्हास्तरीय सल्लागार समिती व जिल्हास्तरीय आढावा समितीच्या बैठकीत ते बोलत होते. यावेळी मुख्य कार्यकारी अधिकारी संजयसिंह चव्हाण, विभागीय व्यवस्थापक शिवकुमार, आरसेटीच्या जिल्हा समन्वयक सोनाली माने उपस्थित होते. रिझर्व्ह बँकेचे सहाय्यक महाप्रबंधक मनोज मून, नाबार्डचे जिल्हा व्यवस्थापक नंदू नाईक, जिल्ह्यातील सर्व बँकांचे जिल्हा समन्वयक व महामंडळाचे व्यवस्थापक व्हीसीद्वारे सहभागी झाले होते.
जिल्हाधिकारी देसाई म्हणाले, महामंडळांकडील तसेच पंतप्रधान स्वनिधी योजनांबाबतचे प्रस्ताव ज्या बँकांकडे प्रलंबित आहेत अशा बँक प्रतिनिधींसोबत महामंडळाच्या व्यवस्थापकांची अग्रणी जिल्हा व्यवस्थापकांनी बैठक घ्यावी. बँकांनी प्रलंबित प्रकरणे लवकरात-लवकर आणि जास्तीत-जास्त निकालात काढावीत त्यासाठी शिबिरे घ्यावीत. इचलकरंजी, जयसिंगपूर या मोठ्या शहरांवर लक्ष केंद्रीत करावे. पीक कर्जाप्रमाणेच बँकांनी महामंडळांबाबत संवेदनशील राहून जास्तीत-जास्त प्रस्ताव मार्गी लावावेत. अग्रणी जिल्हा व्यवस्थापक राहुल माने यांनी विविध योजना आणि महामंडळनिहाय आढावा घेतला.
--
जनधन योजनेंतर्गत उघडलेली खाती : ११ लाख ४१ हजार ३७८
रुपे कार्ड दिलेली खाती : ९ लाख ९९ हजार ३५६
प्रधानमंत्री जीवनसुरक्षा विमा योजनेंतर्गत उघडलेली खाती : ४ लाख ९५ हजार ७४१
प्रधानमंत्री जीवनज्योती विमा योजनेंतर्गत उघडलेली खाती : १ लाख ८८ हजार ८६९
अटल विमा योजनेंतर्गत उघडलेली खाती : ६० हजार ८४७
----
प्रधानमंत्री मुद्रा योजनेंतर्गत डिसेंबरअखेर ७८ हजार ८४९ लाभार्थ्यांना केलेले अर्थसहाय्य : ५२८. ४१ कोटी
प्राथमिकता प्राप्त सेवा क्षेत्राकरिता ९ हजार ३२० कोटींचा आराखडा तयार, डिसेंबरपर्यंत ६ हजार ३५१ कोटी (६८ टक्के) इतकी उद्दिष्ट्यपूर्ती
ठेवी : ३० हजार ६४२ कोटी
कर्जाची शिल्लक : २४ हजार २०१ कोटी
--
फोटो नं ०९०३२०२१-कोल-कलेक्टर बँक बैठक
ओळ : कोल्हापुरातील जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्हाधिकारी दौलत देसाई यांच्या अध्यक्षतेखाली मंगळवारी जिल्हास्तरीय आढावा समितीची बैठक झाली. यावेळी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी संजयसिंह चव्हाण यांच्यासह अधिकारी उपस्थित होते.
----