कागल : येथील श्री छत्रपती शाहू सहकारी साखर कारखान्याच्या पंचवार्षिक निवडणुकीत ऊस उत्पादक गटातून ११ जागांसाठीची मतमोजणी बुधवारी झाली. यामध्ये कारखान्याचे विद्यमान अध्यक्ष समरजितसिंह घाटगे यांच्या नेतृत्वाखालील स्वर्गीय विक्रमसिंहराजे शाहू शेतकरी पॅनेलचे सर्व उमेदवार दहा हजारांवर मते घेत विजयी झाले. ज्यांच्या उमेदवारीमुळे निवडणूक लागली, त्या सदाशिव रामचंद्र तेलवेकर (रा. पिंपळगाव खुर्द) यांना १५१५ इतकी मते मिळाली. निकाल जाहीर झाल्यानंतर राजे गटाच्या कार्यकर्त्यांनी फटाक्यांची आतषबाजी आणि गुलालाची उधळण करीत जल्लोष साजरा केला. चार उमेदवार बिनविरोध निवडून आले आहेत. निवडणुकीसाठी ११,६६२ इतके मतदान झाले होते. सकाळी आठ वाजता साखर गोडावूनमध्ये मतमोजणीस प्रारंभ झाला. निवडणूक निर्णय अधिकारी विजयसिंह देशमुख यांनी मतमोजणी प्रक्रिया संपल्यानंतर दुपारी अडीच वाजता सभेचे कामकाज सुरू करून हा निकाल जाहीर केला. तहसीलदार किशोर घाटगे, दुय्यम निबंधक सुनील चव्हाण यांनी सहायक म्हणून काम पाहिले. राजे गटाच्या कार्यकर्त्यांनी कारखाना परिसर, मतमोजणीचे ठिकाण, सातमोट विहीर परिसरात गर्दी केली होती. समरजितसिंह यांच्यासमवेत प्रवीणसिंह घाटगे, वीरेंद्रसिंह घाटगेही तेथे आले होते. (प्रतिनिधी) विजयी उमेदवार : मिळालेली मते विजयी उमेदवार आणि मते : समरजितसिंह विक्रमसिंह घाटगे (कागल - १०,९२६), वीरकुमार आप्पासो पाटील (कोगनोळी -१०,०१७), अमरसिंह गोपाळराव घोरपडे (माद्याळ -१०,८३६), पांडुरंग दत्तात्रय चौगुले (म्हाकवे -१०,७६५), यशवंत जयवंत माने (कागल -१०,८७२), सचिन सदाशिव मगदूम (पिंपळगाव खुर्द - १०,८५१), मारुती ज्ञानदेव पाटील (पिंपळगाव खुर्द - १०,८८७), धनंजय सदाशिव पाटील (केनवडे - १०,८९४), मारुती दादू निगवे (नंदगाव - १०,९०७), बाबूराव ज्ञानू पाटील (गोकुळ शिरगाव - १०,८७२), भूपाल विष्णू पाटील (कोगील बुद्रुक - १०,८७६). बिनविरोध उमेदवार : सुहासिनीदेवी विक्रमसिंह घाटगे (कागल), रुक्मिणी बंडा पाटील (दिंडनेर्ली), युवराज अर्जुना पाटील (मौजे सांगाव). बिगर ऊस उत्पादक सभासद गट - तुकाराम कांबळे (व्हन्नूर) मागासवर्गीय गट. पॅनेल टू पॅनेल मतदान निवडणुकीत मतदारांनी पॅनेल टू पॅनेल मतदान केल्याचे स्पष्ट झाले. सर्वसाधारण १०,८०० च्या सरासरीने उमेदवारांना मते मिळाली. सर्वाधिक मते समरजितसिंह घाटगे यांना १०,९२६, तर सर्वांत कमी १०,०१७ मते वीरकुमार पाटील यांना मिळाली. वीरकुमार पाटील यांना वगळून तेलवेकर यांना एक मत देण्याचे प्रमाण कागल, सिद्धनेर्ली, केनवडे, व्हन्नाळी या पट्ट्यात दिसले, तर सीमाभागात पॅनेल टू पॅनेल मतदान होते. तेथेही तेलवेकरांना अल्प मते मिळाल्याचे चित्र होते. भागातही हेच चित्र होते. तेलवेकर मतमोजणीत किती मते घेणार? हीच उत्सुकता जास्त होती.
‘शाहू’चा दणदणीत विजय
By admin | Published: September 22, 2016 12:58 AM