शिरोळ : जूनच्या सुरुवातीला पाऊस झाल्यामुळे बऱ्याच शेतकऱ्यांनी पेरण्या उरकून घेतल्या. गतवर्षीपेक्षा यंदा शिरोळ तालुक्यात सोयाबीन पेरणीमध्ये दुप्पट वाढ झाली आहे. १२०० हेक्टरहून अधिक क्षेत्रावर सोयाबीन पीक बहरत आहे. दरम्यान, किडीचा प्रादुर्भाव होण्याच्या शक्यतेने शेतकऱ्यांनी जागरूक राहून त्याचे व्यवस्थापन करावे, असे आवाहन तालुका कृषी विभागाने केले आहे.
कोरोनाचे सावट त्यातच संभाव्य महापुराची भीती अशा दुहेरी संकटात शिरोळ तालुक्यातील शेतकरी असताना यंदा वेळेत पाऊस सुरू झाला. संततधार पावसामुळे कृष्णेसह, वारणा, दूधगंगा व पंचगंगा या नद्या पात्राबाहेर पडल्या होत्या. पाऊस झाल्याने खरीप हंगाम पेरणी चांगली झाली. जूनअखेरीस जवळपास ८५ टक्के पेरण्या पूर्ण झाल्या. पावसामुळे पिकांची उगवणही चांगली झाली. यामध्ये सोयाबीन पीक जोमात आले आहे. जवळपास १२०० हेक्टरहून अधिक सोयाबीनची पेरणी तालुक्यात झाली आहे. दरम्यान, वातावरणातील बदलामुळे पाने कुरतडणारी व गुंडाळणारी अळीचा प्रादुर्भाव होऊ नये, यासाठी शेतकऱ्यांनी जागरूक राहून त्यांचे व्यवस्थापन करावे, असे आवाहन तालुका कृषी अधिकारी गणेश भोसले यांनी केले आहे.
फोटो - १९०७२०२१-जेएवाय-०२
फोटो ओळ - शिरोळ तालुक्यात खरीप हंगामातील सोयाबीन पीक समाधानकारक आले आहे. (छाया-सुभाष गुरव, शिरोळ)