कोल्हापूर : शेतकऱ्यांना यंदा पावसाने झोडपून काढल्याने खरीप पिकांचे मोठे नुकसान झाले. वरुणराजाच्या तडाख्यातून कसेबसे काढलेल्या सोयाबीनला कवडीमोल दराने विकावे लागत आहे. भातालाही जेमतेमच दर मिळत असल्याने यंदा सोयाबीन, भाताचा उत्पादन खर्चही निघेल की नाही, याबाबत शंका आहे.
मान्सूनची सुरुवात होण्यापासूनच यंदा सगळे अंदाज चुकले आहेत. ज्या काळात पाऊस पडणे अपेक्षित होते, त्याकाळात पडलाच नाही अथवा कमी पडला. त्यातून शेतकऱ्यांनी पिकांची जोपासना करुन हातातोंडाला आणली. नेमके काढणीच्या वेळेला पावसाने धुमाकूळ घातला. ढगफुटी सारखा रोज पाऊस कोसळत राहिल्याने भात पिके जमीनदोस्त झाली. त्याचबरोबर सोयाबीनच्या शेंगा कुजल्या. सर्वात जास्त नुकसान साेयाबीन व भात पिकांचे झाले. यातून मोठे कष्ट करुन पिकांची काढणी करुन घरात आणल्यानंतर दर चांगला मिळेल, असे अपेक्षित होते. मात्र सोयाबीनच्या दरात कमालीची घसरण झाली आहे. प्रतिक्विंटल ५०२० ते ५२८५ रुपयांपर्यंत दर खाली आला. सोयाबीनचा किमान दर साडेआठ ते नऊ हजार मिळाला तरच शेतकऱ्यांचा परवडते. मात्र सध्या बाजारात पाच हजारापर्यंत दर खाली आल्याने शेतकरी अडचणीत आला आहे.
घरात ठेवले तर बँकेचे व्याज अंगावर
सोयाबीन काढणीनंतर त्याची विक्री करुन पीक कर्ज भागवले जाते. दर नाही म्हणून घरातच ठेवले तर बँकेचे व्याज अंगावर बसणार आहे. गेल्या हंगामात अनेक शेतकऱ्यांनी दरात वाढ होईल, म्हणून वर्षभर विक्री केली नाही, शेवटी हंगामाच्या सुरुवातीच्या दरापेक्षा कमी दराने विक्री करावी लागली.
जाडा भात १६०० रुपये क्विंटल
परतीच्या पावसाने भात पिकांचे मोठे नुकसान झाल्याने उत्पादन कमी मिळणार आहे. तरीही दर जेमतेमच मिळत आहे. जाडा भात (आरवन) १६०० रुपये, बारीक ११०० ते १५०० रुपये क्विंटल आहे.
गेल्या दहा दिवसात सोयाबीनचे असे राहिले दर -
तारीख - दर प्रतिक्विंटल
- २० ऑक्टोबर ५०२०
- २१ ऑक्टोबर ५०४०
- २२ ऑक्टोबर ५०००
- २३ ऑक्टोबर ५०८०
- २४ ऑक्टोबर ५१३५
- २५ ऑक्टोबर ५१००
- २६ ऑक्टोबर ५०८०
- २७ ऑक्टोबर ५१२०
- २८ ऑक्टोबर ५१००
- २९ ऑक्टोबर ५१६०
- ३० ऑक्टोबर ५१३५
- ३१ ऑक्टोबर ५११०
- १ नोव्हेंबर ५२८५