कोल्हापूर : नव्या पिढीमध्ये अंतराळ संशोधनाची आवड निर्माण व्हावी, अंतराळ व विज्ञानाबाबतचे गैरसमज दूर होऊन युवा वैज्ञानिक तयार व्हावेत, या उद्देशाने कोल्हापुरात भालचंद्र चिकोडे ग्रंथालयाच्या वतीने स्पेस इनोव्हेशन लॅब सुरू होत आहे. या निमित्ताने महाराष्ट्रात प्रथमच अशी लॅब साकारत असून, त्यासाठी उद्या, शनिवारी ग्रंथालय इस्त्रोमध्ये सामंजस्य करार होणार आहे, अशी माहिती राहुल चिकोडे व महाराष्ट्र वैज्ञानिक महामंडळाचे धनेश बोरा यांनी पत्रकार परिषदेत दिली.जरगनगरमधील कै. भालचंद्र चिकोडे ग्रंथालयात पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या प्रेरणेतून मे महिन्यात ही लॅब साकारण्यात येणार आहे; त्यासाठी होणाऱ्या सामंजस्य करारावेळी इस्त्रोचे मुख्य कार्यकारी अधिकारी गोविंद यादव उपस्थित असतील. या लॅबमध्ये मुलांना अत्याधुनिक तंत्रज्ञान, आर्टिफिशिअल इंटेलिजन्स, मशीन लर्निंग असे विषय साध्या व सोप्या कृतीतून शिकविण्यात येतील. भारतात सात हजारांहून अधिक ठिकाणी स्पेस इनोव्हेशन लॅब आणि सेंटर्स सुरू आहे.येथे नेहरू सायन्स सेंटर, इस्त्रो, एसडीएनएक्स, सीआयजीएस, आरडीओ, ब्रिक्स, स्पेस किडस आणि द रोज आॅफ एज्युकेशनतर्फे विविध कार्यशाळा, चर्चासत्रे, तसेच वरील संस्थांचे अनुभवी व तज्ज्ञ वैज्ञानिक मार्गदर्शन करणार आहेत. पहिल्या टप्प्यात ५० विद्यार्थ्यांसाठी ही कार्यशाळा होणार असून, त्यात रोबोटिक आर्म, ड्रोन, सॅटेलाईट असे तब्बल १२ प्रोजेक्ट शिकविले जाणार आहेत; त्यासाठी लागणारे किट संस्थेकडून पुरवले जाईल.
दर आठवड्यात शुक्रवार, शनिवार व रविवारी ही कार्यशाळा घेतली जाईल. प्रत्येक प्रोजेक्ट चार महिन्यांचा असणार आहे. इयत्ता पाचवीपासून ते पीएच.डी.पर्यंतच्या, तसेच सर्वसामान्यांपासून ते मराठी, इंग्रजी माध्यमातील मुलांनाही येथे विज्ञानाचे धडे गिरविता येणार आहेत. देशातील वैज्ञानिकांच्या यादीत कोल्हापूरच्या मातीतील मुलांनाही स्थान मिळावे; यासाठी हा प्रयत्न आहे. परिषदेस रिचा लाटकर उपस्थित होत्या.