कोल्हापुर : शेंडा पार्क येथील खंडपीठाच्या नियोजित जागेवर ‘खंडपीठासाठीची जागा’ असा फलक लावून आंदोलनाचे रणशिंग पुन्हा जोमाने फुंकण्याचा निर्धार शुक्रवारी खंडपीठ कृती समितीच्या बैठकीत करण्यात आला. यावेळी कायमस्वरूपी स्वतंत्र समिती नेमण्याचा निर्णय झाला.
एकदा आंदोलन सुरू केल्यानंतर निर्णय होईपर्यंत थांबू नये, अशा सूचनाही सर्व वकिलांनी केल्या. कोल्हापुरात खंडपीठाचे सर्किट बेंच होण्यासाठीच्या आंदोलनाची पुढील दिशा ठरविण्यासाठी कसबा बावडा येथील जिल्हा न्यायालयातील हॉलमध्ये बैठक झाली. अध्यक्षस्थानी खंडपीठ कृती समितीचे निमंत्रक रणजित गावडे होते.महाराष्ट्र, गोवा बार कौन्सिलचे सदस्य अॅड. विवेक घाटगे म्हणाले, चर्चा, आंदोलन आणि कायदेशीर लढाई अशा तीन प्रकारे आंदोलन सुरू आहे. आता संयम संपत असून कायदेशीर मार्गाने तीव्र लढाई करण्याची वेळ आली आहे.कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाल्याशिवाय यावर निर्णय होणार नाही. त्यामुळे पुढील टप्प्यात आंदोलन तीव्र करावे लागेल. मोहन जाधव, जारीक अत्तार यांनी एकदा सुरू केलेले आंदोलन निर्णय होईपर्यंत मागे घेऊ नये. आंदोलनावेळी सर्वांना विश्वासात घेऊन निर्णय घ्यावा, ‘रास्ता रोको, रेल रोको,’ अशी आंदोलन करण्याची सूचना मांडली.
महाराष्ट्र, गोवा बार कौन्सिलच्या सदस्यपदी निवड झाल्याबद्दल विवेक घाटगे, संग्राम देसाई, वसंत भोसले यांचा सत्कार करण्यात आला. भोसले, देसाई यांनीही भूमिका मांडली. अॅड. राजेंद्र रावराणे, विश्वास चिडमुंगे, दिलीप पोतदार, शिवाजीराव राणे, दिनेश कोठावळे, अजित मोहिते, अमरसिंह भोसले, प्रकाश मोरे, आदींनी मनोगत व्यक्त केले. उपाध्यक्ष अॅड. जे. व्ही. पाटील, सेक्रेटरी गुरुप्रसाद माळकर, अतुल जाधव, शिल्पा सुतार, सपना हराळे, वैभव काळे, रमेश पोवार उपस्थित होते.शेंडा पार्कची जागा खंडपीठासाठीचशेंडा पार्क येथील २४ एकर जागा खंडपीठासाठी आरक्षित आहे. सहा जिल्ह्यांतील सर्व तालुका बार असोसिएशनच्या सदस्यांच्या उपस्थितीमध्ये या ठिकाणी वृक्षारोपण करून परिसरात खंडपीठाची नियोजित जागा असल्याचे फलक लावून नव्याने आंदोलनाचे रणशिंगे फुंकू, असे कृती समितीचे निमंत्रक रणजित गावडे यांनी सांगितले.मशाल परत पेटवावी लागेलसातारा येथील दिलीप पाटील यांनी आंदोलनाचा उत्साह कमी झाला असल्याबाबत खेद व्यक्त केला. जोश संपला असून नव्या जोमाने आंदोलन सुरू करावे. आंदोलनाची मशाल परत पेटवावी लागेल, असेही त्यांनी सांगितले. विरोधक उभे राहणार नाहीत, असे तीक्ष्ण हत्यार वापरण्याची वेळ आल्याचेही त्यांनी सांगितले.