दुर्वा दळवी कोल्हापूर : गावाकडचं वातावरण म्हणजे यात्रा जत्रेचा सध्याचा माहोल. गावोगावी असणाऱ्या यात्रा - जत्रांचे लहान मुलांना आकर्षण असते. वेगवेगळी खेळणी मौज मजा मस्ती लहान मुलांना इथे करता येते. ह्या यात्रा जत्रेसाठी मुल आतुरतेने वाट पाहतात. गेल्या काही दिवसात मुलांच्या चेहऱ्यावरचा हा आनंद कोरोनाने हिरावून नेला आहे. त्यामुळे काही वेगळं करता येत का? यासाठी ती संधीच शोधत असतात. मोबाईलचे वेड मुलांना लागलं असल तरी ते शहरापूर्तेच मर्यादित. ग्रामीण भागात तितके मोबाईलचे वेड मुलांना नाही. त्यामुळे ती कुठे शेतात बागड, नदी - विहिरीवर पोहायला जाऊन आनंद शोधणारी ही सर्व मुलं.
कोल्हापुरातील एका गावात मात्र आता मुलांना चक्क वाळवंटातील सफर घडत आहे. कागलमधील मुरगूड येथे दोन तीन दिवसांपूर्वी एक नाही दोन नाही तर तब्बल अठरा उंट असलेला तांडा आला. गावातल्या लोकांना नेकम कळेना आपण कोल्हापुरातच आहोत की राजस्थानमध्ये. अशी ही उंटांची दिमाखात स्वारी शहरात आली. यानंतर गावातील लहानथोर मंडळी ह्या उंटांच्या तांड्यांकडे निरखून पाहू लागली. म्हशी, घोडे, बैल अन् गाई रस्त्याने जाताना पाहायची सवय तिथे ही उंटाची स्वारी आल्याने त्यांना काही कळेना. पण नंतर हे सगळ कोड उलगडल. उंटांचा तांडा घेऊन आलेली ही मंडळी बारामती दौड भागातली. त्यांनी राजस्थानातून हे उंट आणले असून तांड्यामध्ये एकूण १८ उंट आहेत.
उंटाना घेऊन गावोगावी ही फिरत असतात. गावातील लहान मुलांना उंटावरची सफर ही घडवतात. तेवढाच मुलांनाही विरंगुळा मिळतो. अन् ह्या मंडळींना उदरनिर्वाहासाठी चार पैसे मिळतात. कोरोनामुळे अनेकांचे उदरनिर्वाहाचे प्रश्न निर्माण झाले त्यामुळे जो तो आपल्याला जमेल ते काम करून आपल्या कुटुंब कबिल्याला जपण्यासाठी धडपड करतोय त्यातीलच ही उंट घेऊन आलेली मंडळी.
गावोगावी असलेली मुले ही आनंदाने उंटावर बसून गावभर मस्त फिरून येतात. त्यामुळे गावात हा तांडा आला पासून मुले ह्या नव्या सफरीच्या आनंदात हरवलेली दिसतात. राजस्थानच्या वाळवंटात ही मुले कधी जातील न जातील पण स्वतच्याच गावात त्यांना ही छानपैकी सफर अनुभवायला मिळत आहे त्यामुळे गावकरी ही खुश आहेत. गावातील व्यक्ती ह्या तांडेवाल्यांची आपुलकीने चौकशी ही करतात.