कोल्हापूर : प्रकाश आवाडे जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष झाल्यानंतर जिल्हा परिषदेतील राजकारण बदलले आहे. बुधवारच्या सर्वसाधारण सभेच्या पार्श्वभूमीवर विरोधी आघाडीच्या बैठकीला केवळ राहुल आवाडेच नव्हे, तर सत्तारूढ महिला आणि बालकल्याण समितीच्या सभापती वंदना मगदूम यांनी देखील हजेरी लावली.जिल्हा परिषदेच्या सर्वसाधारण सभेदिवशी बुधवारी काँग्रेस राष्ट्रवादीच्या सदस्यांची जिल्हा परिषद कर्मचारी सोसायटीच्या सभागृहात बैठक झाली. या बैठकीला प्रकाश आवाडे यांच्या ताराराणी आघाडीचे राहुल आवाडे उपस्थित राहणारच होते; मात्र सभापती वंदना मगदूम तेथे जाणार का? याची उत्सुकता होती. मगदूम यांनी तेथे उपस्थित राहत आपण विरोधकांसमवेत राहणार असल्याचे स्पष्ट केले आहे.दरम्यान, स्वाभिमानीच्या शुभांगी शिंदे आणि डॉ. पद्माराणी पाटील या दोघींनाही काँग्रेसकडून निरोप गेले होते; मात्र यातील शिंदे या सत्तारूढांच्या पार्टी मिटिंगला उपस्थित राहिल्या तर डॉ. पाटील यांनी न जाता महिला बालकल्याण सभापतींच्या दालनात बसणे पसंद केले.दरम्यान आतापर्यंत सभापती बदलाच्या वेळी सभापती मगदूम यांचे दीर राजू मगदूम यांनी घेतलेली आक्रमक भूमिका आणि मगदूम यांची पदावर असूनही विरोधकांच्या बैठकीतील उपस्थिती यामुळे सर्वसाधारण सभेत वंदना मगदूम सत्तारूढांच्या टार्गेट ठरल्या.इचलकरंजी येथे महिला आणि बालकल्याण विभागाच्या कार्यक्रमावेळी खासदार राजू शेट्टी आणि आमदार सुरेश हाळवणकर यांची नावे निमंत्रणपत्रिकेत का घातली नाहीत, अशी विचारणा भाजपचे सदस्य प्रसाद खोबरे यांनी केली. यावर उपमुख्य कार्यकारी अधिकारी सोमनाथ रसाळ यांनी सभापतींनी सांगितल्यानुसार निमंत्रण पत्रिका तयार केल्याचे सांगितले.लगेचच राजवर्धन निंबाळकर यांनी हातकणंगले तालुक्यात ११ जिल्हा परिषद सदस्य असताना एकाच सदस्याचे नाव पत्रिकेत कसे? अशी विचारणा केली. अध्यक्षा शौमिका महाडिक यांनीही इचलकरंजीच्या कार्यक्रमाची पत्रिका चुकीची काढल्याचे स्पष्ट केले. एकूणच वातावरण बघून वंदना मगदूम यांनी ‘चूक कबूल करते, दिलगिरी व्यक्त करते’असे सांगितल्यानंतर या विषयावर पडदा पडला.दरम्यान सत्तारूढांचीही पार्टी मिटिंग समिती सभागृहात पार पडली. यावेळी विरोधकांना आक्रमक पद्धतीने उत्तर देण्याचे ठरवून अर्थसंकल्प मंजूर करवून घेण्याचा निर्धार व्यक्त करण्यात आला होता.