कोल्हापूर : जिल्ह्यातील प्राथमिक व माध्यमिक शाळांतील मुलांचे शिष्यवृत्ती अर्ज प्रस्ताव सादर करण्यासाठी मुख्याध्यापकांना जिल्हा परिषदेच्या समाजकल्याण विभागाने आणखी एक मुदतवाढ देत येत्या बुधवारी विशेष कॅम्पचे आयोजन केले आहे. पुन्हा मुदतवाढ दिली जाणार आहे, मुख्याध्यापकांनी वेळेत पूर्तता करावी, असे आवाहन जिल्हा समाजकल्याण अधिकारी दीपक घाटे यांनी केले आहे.
स.म. लोहिया विद्यालयात सकाळी १० ते सर्व अर्ज स्वीकारून होईपर्यंत हा विशेष कॅम्प सुरू राहणार आहे. त्यामुळे शाळेतील अद्याप प्रलंबित राहिलेले शिष्यवृत्ती अर्ज कोणत्याही परिस्थितीत बुधवारी आणून जमा करायचे आहेत.
आतापर्यंत जिल्हा परिषदेने दोन वेळा मुदतवाढ देत अर्ज जमा करण्याचे आवाहन केले होते; पण नेहमीप्रमाणे मुख्याध्यापकांनी काेरोनाचे कारण सांगत टाळाटाळ केली. अर्ज प्रक्रिया पूर्ण झाली नाही तर मार्चपूर्वी जमा करणे शक्य होत नाही. विद्यार्थी शिष्यवृत्तीपासून वंचित राहू शकतात. जानेवारी व फेब्रुवारीमध्ये शिबिर झाले. शेवटचे शिबिर चार दिवसांपूर्वी कोल्हापुरातच लोहिया विद्यालयात झाले होते. यावेळी अर्ज स्वीकारण्यावरून शिक्षकांनी मोठा गाेंधळ घातला होता. आता आणखी एक संधी देत अर्ज जमा करण्यास सांगण्यात आले आहे.