कोल्हापूर : भाजप-शिवसेनेच्या नेत्यांचा खरपूस समाचार घेत गृहमंत्री आर. आर. पाटील यांनी आज, मंगळवारी येथे प्रभावी भाषण केले. या भाषणाला टाळ्या आणि शिट्ट्यांच्या गजरात उपस्थितांनी दाद दिली. आबांच्या या भाषणाने प्रभावित झालेल्या उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दाद देत आर. आर. पाटील यांचे भाषण ऐकून आपली ‘सटकली’ असे वक्तव्य केले. त्यालाही उपस्थितांनी उत्स्फूर्तपणे दाद दिली.गांधी मैदान येथे राष्ट्रवादी कॉँगे्रस पक्षाची विराट प्रचार प्रारंभ सभा आयोजित करण्यात आली होती. यावेळी ते बोलत होते. अजित पवार यांनी अनेक निवडणुका येत असतात. अनेक स्थित्यंतरे होत असतात. त्यामुळे कार्यकर्त्यांनी लोकसभेच्या निकालाने खचून जाऊ नये. येणाऱ्या निवडणुकीत विरोधकांकडून खालच्या पातळीवर जाऊन प्रचार केला जाईल. त्याला माझ्यासह सर्व पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी योग्य प्रत्युत्तर दिले पाहिजे, असे सांगितले.केंद्राकडून शेतकऱ्यांच्या प्रश्नांकडे दुर्लक्ष केले जात आहे. याची दखल शेतकऱ्यांनी घेतली पाहिजे. श्री अंबाबाईच्या साक्षीने जे महाराष्ट्रातील प्रलंबित प्रश्न आहेत ते शंभर दिवसांत सोडवून दाखवू, अशी ग्वाही त्यांनी दिली.ग्रामविकासमंत्री जयंत पाटील यांनी मोदी लाट ओसरत चालली असल्याचे सांगून राजस्थान, उत्तर प्रदेश या राज्यांमध्ये विधानसभा पोटनिवडणुकीत लागलेल्या उलट्या निकालाचे दाखले यावेळी दिले. येणाऱ्या काळात राजर्षी शाहूंच्या नगरीत जातीयवादी लाट कदापिही टिकू शकणार नसल्याचे त्यांनी सांगितले. सांगलीत थोडीशी पडझड झाली आहे. ती दुरुस्त करून तीनाचे पाच आमदार करण्याची व्यवस्था आम्ही करू, अशी ग्वाही पाटील यांनी दिली.जलसंपदामंत्री हसन मुश्रीफ म्हणाले, पक्षाकडून जे उमेदवार दिले जातील, त्यासाठी जिवाचे रान करून ते निवडून आणू. पक्षाने प्रसंगी दहा उमेदवार दिले तर तेही निवडून आणू.जलसंपदामंत्री (कृष्णा खोरे) शशिकांत शिंदे यांनी सातारा हा राष्ट्रवादी कॉँग्रेसचा बालेकिल्ला असून तो शाबूत ठेवत सर्वच जागा निवडून आणू, असा शब्द देत मुख्यमंत्री राष्ट्रवादी कॉँग्रेसचाच होईल, असा विश्वासही व्यक्त केला.यावेळी खासदार धनंजय महाडिक, माजी खासदार निवेदिता माने, जिल्हाध्यक्ष आमदार के. पी. पाटील, सांगलीचे जिल्हाध्यक्ष विलासराव शिंदे, आरपीआय (खरात गट) सचिन खरात यांचे भाषण झाले.
आबांच्या भाषणाने दादांची ‘सटकली’
By admin | Published: September 17, 2014 12:16 AM