कोल्हापूर : ग्रामपंचायत निवडणुकीचा निकाल लागणाऱ्या दिवसापासूनच कोल्हापुरात सहकारातील सर्वांत मोठ्या संस्था असलेल्या केडीसीसी व गोकुळ दूध संघाच्या पंचवार्षिक निवडणुकीची प्रक्रिया सुरू होत आहे. एप्रिलच्या पहिल्या आठवड्यात मतदानाची शक्यता असल्यामुळे ग्रामपंचायतीच्या जोडण्यांतून रिकामे होत नाहीत तोवर नेते, कार्यकर्त्यांना नव्या जोडण्यांसाठी सज्ज राहावे लागणार आहे. केडीसीसीचे ठराव संकलन सोमवार (दि. १८) पासून होत आहे, तर याच वेळी ‘गोकुळ’ची प्रारूप यादी प्रसिद्धीला देण्याआधी मान्यतेसाठी पुण्यातील दुग्ध उपनिबंधकांकडे पाठविली जाणार आहे.
जिल्ह्याच्या राजकारणात सहकारातील सर्वोच्च संस्था असलेल्या केडीसीसी व ‘गोकुळ’साठी गेले वर्ष-दीड वर्ष अनेकांनी देव पाण्यात घालून ठेवले आहेत. या ना त्या कारणाने निवडणुका पुढे गेल्या. कोरोनाेमुळे तर सुरू झालेला निवडणूक कार्यक्रम स्थगित करावा लागला. अखेर चार दिवसांपूर्वी जेथून कार्यक्रम स्थगित झाला आहे, तेथूनच तो पुढे सुरू करावा, असे निर्देश सहकार प्राधिकरणाकडून आल्यापासून घडामोडी वेगावल्या आहेत. ग्रामपंचायत निवडणुकीचा निकाल सोमवारी लागल्यानंतर सरपंचपदाचे आरक्षण, त्याच्या जोडण्या याबराेबरच या ठराव व मतदार याद्यांकडे लक्ष घालावे लागणार असल्याने, हा महिना राजकीय व प्रशासकीय यंत्रणेसाठी धावपळीचाच ठरणार आहे.
चौकट ०१
गोकुळची प्रारूप यादी पुढील आठवड्यात
गोकुळसाठी २२ डिसेंबर ते जानेवारी २०२० पर्यंत तीन हजार ६५९ पैकी तीन हजार ६५४ ठराव जिल्हा दुग्ध निबंधकांकडे सादर झाले आहेत. आता या ठरावांनुसार मतदारांची प्रारूप यादी तयार केली जाणार आहे. त्यासाठी सोमवारीच ही यादी अंतिम मान्यतेसाठी पुण्यातील दुग्ध उपनिबंधक सुनील शिरापूरकर यांच्याकडे पाठविली जाणार आहे. त्यांनी प्राधिकृत अधिकारी म्हणून गजेंद्र देशमुख यांची नियुक्ती केल्यानंतर पुढील आठवड्यात ही यादी प्रसिद्ध केली जाणार आहे. यावर हरकती घेतल्यानंतर अंतिम मतदार यादी मार्चमध्ये प्रसिद्ध होणार आहे.
चौकट ०२
‘केडीसीसी’चे उर्वरित ठराव संकलन सुरू
मार्चमध्ये स्थगित करण्यात आलेली केडीसीसीची ठराव संकलन प्रक्रिया येत्या सोमवारपासून सुरू होत आहे. विकास सेवा संस्था, नागरी पतसंस्था, बँका, पाणीपुरवठा, दूधसंस्था, खरेदी-विक्री संघ या गटातून सात हजार १७५ ठराव विभागीय सहनिबंधकांकडे मार्चमध्येच दाखल झाले आहेत. मतदानासाठी १० हजार संस्था मात्र आहेत; म्हणजेच शिल्लक राहिलेले २८२५ ठराव सोमवारपासून (दि. १८) २५ जानेवारीपर्यंत आठ दिवसांत जमा करावे लागणार आहेत. त्यानंतर हरकती व अंतिम मतदार यादी प्रसिद्ध होऊन प्रत्यक्ष मतदान एप्रिलच्या पहिल्या आठवड्यात घेण्याबाबतची तयारी सुरू होणार आहे.
प्रतिक्रिया...
‘गोकुळ’ची प्रारूप मतदार यादी प्रसिद्ध करण्याबाबतचा निर्णय सोमवारच्या बैठकीत ठरणार आहे. साधारणपणे पुढील आठवड्यापासून ही प्रक्रिया अधिक वेग घेईल, असे नियोजन केले आहे.
- गजेंद्र देशमुख, साहाय्यक दुग्ध निबंधक, कोल्हापूर