कोल्हापूर : बारावीच्या गुणपत्रिका मिळाल्याने आता पदवी प्रथम वर्षाच्या प्रवेश प्रक्रियेला बुधवारपासून गती मिळणार आहे. गुणपत्रिका घेण्यासाठी मंगळवारी महाविद्यालयांमध्ये विद्यार्थ्यांनी गर्दी केली. पुढील प्रवेश प्रक्रियेची चौकशी विद्यार्थी, पालकांकडून करण्यात येत आहे.यावर्षी बारावीचा निकाल दि.२८ मे रोजी जाहीर झाला. त्यानंतर मंगळवारी बहुतांश महाविद्यालयांमध्ये दुपारी तीननंतर विद्यार्थ्यांना गुणपत्रिकांचे वाटप करण्यात आले; त्यासाठी महाविद्यालयांनी प्रवेश कक्ष, ग्रंथालय, आदी ठिकाणी स्वतंत्र व्यवस्था करण्यात आली होती.
आॅनलाईन निकाल जाहीर झाल्यानंतर काही महाविद्यालयांनी प्रथम वर्षाची प्रक्रिया सुरू केली; मात्र, गुणपत्रिकेची मूळ प्रत हातात नसल्याने या प्रक्रियेला विद्यार्थ्यांचा कमी प्रतिसाद होता. गुणपत्रिकेची मूळ प्रत मंगळवारी मिळाल्यानंतर महाविद्यालयात पदवी प्रथम वर्षाचे प्रवेश अर्ज घेणे, प्रक्रियेचे वेळापत्रक, शुल्क, आदींची माहिती विद्यार्थी, पालक घेत होते.
दरम्यान, गुणपत्रिका मिळाल्याने विविध महाविद्यालयांतील पदवी प्रथम वर्षाच्या प्रक्रियेची गती वाढणार आहे. विवेकानंद महाविद्यालय आणि गोखले कॉलेजमध्ये पदवी प्रथम वर्षाची प्रक्रिया आॅनलाईन राबविली जाणार आहे.
अन्य महाविद्यालयांमध्ये बुधवारपासून अर्ज वितरण सुरू होईल. गुणवत्ता यादी दि. २२ जूनपासून प्रसिद्ध होईल. त्यानंतर दोन दिवसांत प्रवेश प्रक्रिया पूर्ण करून दि. २५ जूनपासून वर्ग सुरू करण्याचे नियोजन महाविद्यालयांनी केले आहे.
‘सेल्फी’ घेत आनंदविद्यार्थी-विद्यार्थिनी आपल्या मित्र-मैत्रिणींसमवेत गुणपत्रिका नेण्यासाठी महाविद्यालयांमध्ये आले होते. गुणपत्रिका हातात मिळाल्यानंतर विद्यार्थी-विद्यार्थिनींमध्ये प्रवेशाबाबतच्या गप्पा रंगल्या होत्या. मूळ गुणपत्रिका हातात मिळाल्यानंतर अनेक विद्यार्थ्यांनी आपल्या मित्र-मैत्रिणींसमवेत सेल्फी टिपून आनंद व्यक्त केला.