जहाँगीर शेख- कागल --राज्यातील ‘क’ वर्ग नगरपालिकांमध्ये आघाडी घेत कागल नगरपालिकेने शहरात जोरदार स्वच्छता अभियान राबविले आहे. ‘हागणगारीमुक्त कागल’ हे चित्र आता स्पष्टपणे दिसत आहे. गेली पाच वर्षे प्रशासकीय पातळीवरून सुरू असलेल्या या प्रयत्नांना अखेर यश आले आहे. राज्याच्या नगरविकास संचलनालयानेही याची आता दखल घेतली आहे. कागल शहरात चोहोबाजूंना उघड्यावर शौचास बसण्याची ठिकाणे होती. काही पारंपरिक जागावरील हागणदाऱ्यांशिवाय महामार्गालगत, यशवंत किल्ला, गोसावी वसाहत, पुणे-बंगलोर महामार्गालगतचे चित्र तर अत्यंत विदारक होते. नगरपालिका प्रशासनाने विशेषत: आरोग्य विभागाने संबंधित नगरसेवकांना या मोहिमेत सहभागी करून घेत हागणदारीमुक्त कागल बनविण्याचा आराखडा तयार केला. त्यानुसार हागणदाऱ्या आणि तेथील रहिवासी क्षेत्र याचा अभ्यास करून कारणे शोधली आणि त्या पध्दतीने उपाययोजना सुरू केल्या. त्यासाठी शहरातील सार्वजनिक शौचालयांची संख्या वाढविणेत आल्या आहेत. त्यांची दुरूस्ती, गरजेनुसार पुरवता येणारी फिरती शौचालये, व्यक्तिगत शौचालयांची संख्या वाढविणे आणि उघड्यावर शौचास बसणाऱ्यांवर कारवाईची धडक मोहीम गेली तीन वर्षे उघडल्यामुळे आता हागणदारीमुक्त शहर दिसत आहे. विशेष म्हणजे शहरातील महामार्गालगतची हागणदारी मुक्त झाली. मात्र, गोसावी वसाहतीजवळील हागणदारी कायम होती. शाहू कॉलनी ते मुरगूड रोड असा गोसावी वसाहतीतून जाणारा रस्ता या हागणदारीमुळे बंद झाला. रस्त्याच्या दुतर्र्फा इतकी घाण होती की येथील ये-जाच बंद झाली. नगरपालिकेने येथे सुरुवातीला गांधीगिरी पध्दतीने नंतर कडक कारवाई करीत ही हाणदारीही उठविली आणि हागणदारीमुक्त कागल शहर बनवल्याचे जाहीर केले आहे. अजून काही उपनगरांत मोकळ्या पडलेल्या जागेवर शौचास बसण्याचे प्रकार घडतात, मात्र नवी हागणदारी निर्माण होणार नाही. याकडेही पालिकेचे लक्ष आहे. ९३५ कुटुंबांना अनुदान : २७१ जणांना मंजूरकागल शहरात गेल्या वर्षभरात ९३५ कुटुंबांना केंद्र सरकारच्या योजनेतून शौचालय उभारणीसाठी प्रत्येकी १० हजार रूपयांचे अनुदान दिले आहे. तर २७१ जणांना मंजूर आहे. शहरात २२० सार्वजनिक शौचालये आहेत. दोन फिरती शौचालये आहेत. आरोग्य विभागाचे ४० कायमस्वरूपी, तर ६० ठेकेदारीवरील कर्मचारी ही यंत्रणा सांभाळत आहेत. याच विभागाने पोलिसांची मदत घेत मॉर्निंग पथक तयार करून उघड्यावर शौचास बसणाऱ्यांविरूध्द कडक कारवाई केली होती. कागल शहर हागणदारीमुक्त करण्यासाठी गेली पाच वर्षे नियोजनबद्ध पद्धतीने काम करण्यात आलेले आहे. नगरपालिका कर्मचाऱ्यांच्या अधिकाऱ्यांबरोबरच नगराध्यक्षा-नगरसेवक, सामाजिक कार्यकर्ते आणि नागरिकांचे सहकार्य आणि सहभागामुळेच हे शक्य झाले आहे. - प्रभाकर पत्की, मुख्याधिकारी
कागलला स्वच्छता अभियानास वेग
By admin | Published: October 26, 2015 8:44 PM