कोल्हापूर : टेंबलाई नाका उड्डाणपूल येथे भरधाव कारवरील नियंत्रण सुटल्याने कार चालकाने रस्त्यालगत पार्क केलेली नऊ वाहने उडवली. शुक्रवारी (दि. १४) मध्यरात्री दोनच्या सुमारास झालेल्या या अपघातात बुलडोझर व्यावसायिक कारचालक धीरज शिवाजीराव पाटील सडोलीकर (वय ५५, रा. राजारामपुरी, नववी गल्ली, कोल्हापूर, मूळगाव सडोली खालसा ता. करवीर) यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. दिवंगत आमदार पी. एन. पाटील यांचे ते चुलत पुतणे होते. रात्रीच्या वेळी रस्त्यावर कोणीही नसल्याने मोठा अनर्थ टळला. अपघातात दहा वाहनांचे सुमारे अडीच लाखांचे नुकसान झाले. वाहन चालवतानाच हृदयविकाराचा जोरात धक्का बसल्याने ही घटना घडल्याची शक्यता आहे. शवविच्छेदनानंतर व्हिसेरा राखून ठेवण्यात आला आहे.बुलडोझर व्यावसायिक धीरज पाटील हे शुक्रवारी रात्री ताराबाई पार्क येथे धुळवडीनिमित्त मित्रांसोबत जेवायला गेले होते. घरी परत जाताना टेंबलाई नाका उड्डाणपुलाजवळ वळण घेऊन राजारामपुरीच्या दिशेने जाताना त्यांचे कारवरील नियंत्रण सुटले.प्रचंड वेगाने आलेल्या कारने रस्त्याकडेच्या सात दुचाकी आणि दोन रिक्षा उडवल्या. त्यानंतर फुटपाथला धडकून कार थांबली. हृदयविकाराचा धक्का आल्यानंतर त्यांचा गाडीच्या ॲक्सलेटवर जोरात पाय पडल्यानेच कारने प्रचंड वेग घेतला असावा, अशीही शक्यता व्यक्त होत आहे. मोठा आवाज झाल्याने परिसरातील नागरिक घरातून बाहेर आले. त्यांनी जखमी अवस्थेतील पाटील यांना खासगी रुग्णालयात दाखल केले.अपघाताची माहिती मिळताच राजारामपुरी पोलिसांनी घटनास्थळी पोहोचून अपघातग्रस्त वाहने हटवली. खासगी रुग्णालयात उपचारादरम्यान पाटील यांचा मृत्यू झाला. याबाबत पोलिस हवालदार दिगंबर दगडू कुंभार (वय ५५) यांनी फिर्याद दिली. बेदरकारपणे वाहन चालवल्याबद्दल पाटील यांच्यावर गुन्हा दाखल केला.व्यवसायात दबदबाधीरज हे महाराष्ट्रासह अनेक राज्यांत बुलडोझर व्यावसायिक म्हणून प्रसिद्ध असलेल्या आर. डी. पाटील सडोलीकर यांचे पुतणे. त्यांचे वडील एस. डी. पाटील हे देखील याच व्यवसायात होते. आता हा व्यवसाय कमी झाल्यावर त्यांनी बंगळुरू परिसरात पवनचक्की उद्योगात चांगलाच जम बसवला होता. आरोग्याबाबतही ते चांगले दक्ष होते. मागच्या तीन वर्षांत सुमारे ३० किलो वजन त्यांनी कमी केले होते. शिवाजी विद्यापीठात ते रोज मॉर्निंग वॉक करत होते. दिवंगत नेते पी. एन. पाटील यांच्या विधानसभा निवडणुकीत ते सक्रिय असत.
सायबर चौकातील अपघाताची आठवणशिवाजी विद्यापीठाचे माजी प्र-कुलगुरू व्ही. एम. चव्हाण यांचे कारवरील नियंत्रण सुटून सायबर चौकात ३ जून २०२४ मध्ये भीषण अपघात झाला होता. त्या अपघातात चव्हाण यांच्यासह चौघांचा मृत्यू झाला होता. पाटील यांच्या अपघाताने कोल्हापूरकरांना सायबर चौकातील त्या अपघाताची आठवण झाली.
सीसीटीव्ही फुटेज व्हायरलशुक्रवारी मध्यरात्री २ वाजून १० मिनिटांनी झालेल्या अपघाताचे सीसीटीव्ही फुटेज शनिवारी समाज माध्यमात जोरदार व्हायरल झाले. राजारामपुरीच्या दिशेने निघालेल्या भरधाव कारने क्षणात रस्त्याकडेची वाहने उडवली. त्यानंतर हवेत उडून काही अंतर पुढे गेलेली कार फुटपाथला धडकली. कारमधील एअर बॅग उघडल्या होत्या. तरीही पाटील यांच्या डोक्याला आणि छातीला दुखापत झाली. कार बंद करेपर्यंत आपत्कालीन सायरन वाजत राहिला.