लोकमत न्यूज नेटवर्क
इचलकरंजी : लॉकडाऊननंतर सुरू झालेल्या सर्वच उद्योगधंद्यांत व्यावसायिक समीकरणे बदलली आहेत. त्याचप्रमाणे मंदीच्या लाटेतून सावरणाऱ्या वस्त्रोद्योगातील यंत्रमागधारकांचे चक्रही अद्याप सुरळीतपणे फिरण्यासाठी अडचणी निर्माण झाल्या आहेत. त्यातच यंत्रमाग उद्योजकांच्या आत्महत्या हा चिंतेचा विषय बनला आहे. अशा परिस्थितीतून मार्गक्रमण करीत असताना व्याजाच्या गोरखधंद्यात गुरफटलेल्यांना सांभाळून घेत त्यांना योग्य मार्ग दाखविण्याची गरज आहे.
गेल्या दहा वर्षांपासून वस्त्रोद्योग क्षेत्रात कमालीची मंदी निर्माण झाली आहे. त्यामध्ये गेल्या चार-पाच वर्षांत अधिकच मंदी आल्याने काही यंत्रमागधारक आपले कारखाने बंद करून अन्य व्यवसायाकडे वळले, तर पारंपरिक व्यवसाय म्हणून नुकसानीतही आपले व कामगारांचे कुटुंब चालवत जेमतेम पद्धतीने व्यवसाय चालू ठेवून तग धरून राहिलेले यंत्रमागधारक लॉकडाऊनमुळे पुरते बुडाले. या शहरात वस्त्रोद्योगाला १०० वर्षांची परंपरा आहे. अनेक कामगारच पुढे जाऊन मालक बनले. २४ तास व्यवसाय चालवून कष्टातून उद्योजक बनलेल्या अनेकांना बॅँकांमधून आवश्यक कर्ज पुरवठा मिळत नाही. त्यामुळे त्यांना अन्य खासगी संस्था अथवा खासगी सावकारांकडे व्यवसायासाठी कर्ज घ्यावे लागते.
याच कर्जाच्या व व्याजाच्या गोरखधंद्यात गुरफटलेल्या काही उद्योजकांनी आपले यंत्रमाग कारखाने विकून कर्जे भागवली. त्यातूनही ज्यांचे भागले नाही, त्यांनी मुदत घेऊन परतफेड करण्यासाठी धडपड सुरू ठेवली, परंतु लॉकडाऊनमुळे त्यात मोठी अडचण निर्माण झाली. त्यातूनच काहींनी आत्महत्येसारखा निर्णय घेतला. ज्यांनी सुसाईड नोट लिहून ठेवली, त्यामध्ये कर्ज व व्याजाचा तगादा तसेच व्यवसायातील अडचणींचा स्पष्टपणे उल्लेख केला आहे.
याची शासनाने गांभीर्याने दखल घेऊन घोषणा केलेल्या सवलती ताबडतोब लागू कराव्यात. त्याचबरोबर खासगीमधील कर्जांमध्ये अडकलेल्या उद्योजकांना शासनासह विविध यंत्रमागधारक संघटनांनी सहानुभूती देत योग्य मार्ग दाखवावा.
चौकट
व्यापारी-उत्पादक सलोखा आवश्यक
सूत व्यापाऱ्यांनी कृत्रिम दरवाढ करून अडचणीत असलेल्या यंत्रमागधारकांना लुटण्याचे काम सुरू केले आहे, अशी भावना यंत्रमागधारकांतून व्यक्त होत आहे, तर सूत व्यापाऱ्यांकडून असा प्रकार होत नसल्याचे सांगितले जाते. यामध्ये दोन्ही घटकांनी एकत्र येत सलोखा निर्माण करणे आवश्यक आहे. त्यासाठी संयुक्त बैठकही बोलवण्यात आली. परंतु ती अद्याप झाली नाही.