संत नामदेवांनी घुमानमध्ये अध्यात्माचा प्रसार केला. त्याचप्रमाणे संत निरंकारी यांनी मानवता, एकता, शांती, समतेचा संदेश दिला. त्यांच्या नावाने सुरू झालेल्या ‘संत निरंकारी मिशन’ या संस्थेद्वारे आज गुरुवारपासून करवीर भगिनी मंडळ येथे आध्यात्मिक प्रदर्शनीचे आयोजन करण्यात आले आहे. या पार्श्वभूमीवर संस्थेचे विभागीय प्रमुख अमरलाल निरंकारी यांच्याशी साधलेला हा थेट संवाद..प्रश्न : संत निरंकारी मंडळाचा उद्देश काय ? मंडळाची स्थापना कधी झाली ?उत्तर : संत निरंकारी हे एक अवतारी पुरुष होते. त्यांनी जगाला प्रेम, शांती आणि समतेचा संदेश दिला. वर्तमान सद्गुरू निरंकारी बाबा हरदेवसिंहजी हे मानवतेचा संदेश घेऊन जगभर भ्रमंती करीत आहेत. ‘धर्म माणसाला तोडत नाही, तर जोडतो’, असे त्यांचे म्हणणे आहे. सध्या समाजामध्ये प्रेम, नम्रता, सहनशीलता, दया, करूणा यासारखी मानवी मूल्ये ढासळत चालली आहेत. या मानवी मूल्यांना बळकटी देण्यासाठी १९२९ सालापासून संत निरंकारी मंडळाची स्थापना झाली. हे मंडळ कोणतीही विशिष्ट व्यक्ती किंवा जाती-धर्माचे नाही. सर्व धर्म, सांप्रदाय यांना एकाच धाग्यात बांधण्याचा मंडळ प्रयत्न करीत आहे. कोल्हापुरात १९४७ मध्ये या मिशनची स्थापना झाली. गांधीनगर परिसरात याचे मुख्य केंद्र आहे. गोवा, कोल्हापूर, सांगली परिसरात मिशनचे दीड लाख अनुयायी आहेत. देशातच नाही, तर जगभरात संस्थेच्या शाखा कार्यरत आहेत. प्रश्न : संत निरंकारी मिशनचे काम कसे चालते?उत्तर : मिशनच्यावतीने सत्संग, सेवादल असे विविध विभाग चालविले जातात. दिल्लीत निरंकारी हेल्थ सिटी नावाचे मोठे रुग्णालय आहे. जेथे अनेक रुग्णांना आरोग्य सेवा पुरविल्या जातात, आमचा सेवादल हा विभाग मुख्य मोठ्या प्रमाणात कार्यरत आहे. देशभरात ज्या-ज्या ठिकाणी भूकंप, सुनामी, उत्तराखंडसारखा महाप्रलय अशी आपत्ती येते त्या-त्या ठिकाणी हे सेवादल सर्वांत आधी पोहोचते. तेथे बचावकार्य, नागरिकांसोबतच लष्कराच्या जवानांनाही सहकार्य केले जाते. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या ‘स्वच्छ भारत’ आवाहनानुसार देशातील नदीकाठांची स्वच्छता करण्यात आली. काही दिवसांपूर्वी सेवादलाच्यावतीने कोल्हापुरातील पंचगंगा नदीघाट आणि रंकाळा परिसराची स्वच्छता करण्यात आली होती. याशिवाय रक्तदान शिबिर घेतले जाते. मिशनचे काम पाहून ‘युनो’ने मिशनला त्यांच्या सामाजिक व आर्थिक परिषदेवर सल्लागार म्हणून सेवा करण्याची संधी दिलेली आहे. प्रश्न : या आध्यात्मिक प्रदर्शनीचा उद्देश काय?उत्तर : संत निरंकारी मिशनची निरंकारी प्रदर्शनी हे आजवर राज्य, देश-विदेश पातळीवर निरंकारी संत समागमांमधील एक विशेष आर्कषण आहे. दरवर्षी लाखो भाविक आणि जिज्ञासू लोक या प्रदर्शनीला भेट देतात. मानवजातीचे सर्वांगीण कल्याण या उद्देशाने देशभरात या प्रदर्शनीचे आयोजन केले जाते. यावर्षी जानेवारीपासून भिलवाडा (राजस्थान), जबलपूर, बर्धमान, नवी मुंबई, नाशिक, पारडी, टाटानगर, लखनौ, हरिद्वार, अलाहाबाद या ठिकाणी हा प्रदर्शनी भरविण्यात आली आहेत. एप्रिल महिन्यात जळगाव, अहमदनगर, आणि मे महिन्यात बंगलोर, गुलबर्गा, मुंबई येथे त्याचे आयोजन करण्यात आले आहे. प्रश्न : या प्रदर्शनीत नागरिकांना काय पाहायला मिळणार आहे ?उत्तर : दिल्लीच्या रामलीला मैदानात १९७६ मध्ये आयोजित वार्षिक निरंकारी संत समागमामध्ये प्रदर्शनास प्रारंभ झाला. त्यात निरंकारी दर्शनाची सार्थकता सिद्ध करण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. प्रदर्शनीत एका बाजूला कलात्मकतेचा अविष्कार, दुसरीकडे सहजता आणि साधेपणा आहे. प्रदर्शनीच्या दुसऱ्या भागात निरंकारी सिद्धांत असून, त्यात मिशनचे पाच प्रण, सत्संग, सेवा व स्मारक या भक्तीच्या विभिन्न अंगांचे दर्शन घडविण्यात आले आहे. सद्गुरू बाबा हरदेवसिंहजी महाराज यांच्या ३३ वर्षांच्या कारकिर्दीचा आढावा आणि पाचव्या भागात संत निरंकारी मिशनची प्रमुख वैशिष्ट्ये दर्शविण्यात आली आहेत. तसेच सेवादलाचा संक्षिप्त इतिहास व कार्याचीही माहिती असणार आहे. हे प्रदर्शनी १९ तारखेपर्यंत सकाळी ९ ते रात्री ९ वाजेपर्यंत खुली राहणार आहे. शब्दांकन : इंदुमती गणेश
जगण्याची मूल्ये मांडणारी आध्यात्मिक प्रदर्शनी
By admin | Published: April 15, 2015 9:14 PM