चंदगड : पाटणे फाटा, हलकर्णी फाटा, नागणवाडी फाटा, चंदगड फाटा व कानूर फाट्याच्या दुतर्फा शोभिवंत झाडांची लागवड करण्यात आली आहे. त्यामुळे पुन्हा एकदा या फाट्यांना गतवैभव प्राप्त होणार असल्याची माहिती सार्वजनिक बांधकाम खात्याचे उपअभियंता संजय सासणे यांनी ‘लोकमत’ला दिली.
पाटणे फाटा, हलकर्णी फाटा, नागणवाडी फाटा, चंदगड व कानूर फाट्यावर मोठी बाजारपेठ वसलेली आहे. लोकांची वर्दळ नेहमीच याठिकाणी असते. त्यामुळे शंभरहून अधिक वर्षे जीर्ण झाडांची संख्या या फाट्यांवर अधिक होती. पण लोकांच्या सुरक्षिततेचा विचार करून सार्वजनिक बांधकाम खात्याकडून या फाट्यांवरील धोकादायक झाडे काही महिन्यांपूर्वी तोडण्यात आली होती. त्यामुळे फाट्यांवरची सावली व निसर्ग सौंदर्यच गायब झाले होते. जणू सर्व फाट्यांना सार्वजनिक बांधकाम खात्याने बोडके केले होते.
या फाट्यांवरील झाडे तोडताना अनेक निसर्गप्रेमी लोकांनी कडाडून विरोध केला होता. त्यावेळी सार्वजनिक बांधकाम खात्याकडून तोडलेल्या झाडांच्या ठिकाणी पुन्हा झाडे लावू व या फाट्यांचे गतवैभव पुन्हा उभारू, असे त्यांना सांगितले होते. त्यानुसार या खात्याकडून पाटणे फाट्यावर झाडे लावण्यासाठी खड्डे खोदून त्यामध्ये विविध प्रकारच्या शोभिवंत झाडांची रोपे लावण्यात आली आहेत.
.............
कमी उंचीची व सावली देणाऱ्या झाडांची लागवड
जीर्ण झाडे ही मोठी व धोकादायक होती. तो अनुभव लक्षात घेऊन सार्वजनिक बांधकाम खात्याने शोभिवंत व कमी उंचीच्या झाडांना प्राधान्य दिले आहे. जेणेकरून भविष्यात ही झाडेही धोकादायक होऊ नयेत, याचीही काळजी या खात्याने घेतली आहे.
..............
निसर्गप्रेमींना आश्वासन दिले होते की, धोकादायक झाडे तोडल्यानंतर त्याठिकाणी नवीन झाडे लावून देऊ. फक्त तेवढ्यावरच न थांबता त्याची देखभालही सार्वजनिक बांधकाम खात्याकडून केली जाईल, असेही उपअभियंता सासणे यांनी सांगितले आहे.
फोटो ओळी : पाटणे फाटा (ता. चंदगड) येथील फाट्यावर विविध प्रकारच्या शोभिवंत झाडांची करण्यात आलेली लागवड.
क्रमांक : १३०९२०२१-गड-२५