कोल्हापूर : एकदा का कोल्हापूरवासियांनी ठरवले की ते किती प्रभावीपणे मनावर घेतले जाते याचे प्रत्यंतर गुरूवारी रात्री गणेश विसर्जन मिरवणुकीमध्ये आले. मोठ्या आवाजाच्या ध्वनीयंत्रणांना फाटा दिल्याने यावेळी प्रकाशाच्या वाटांनी विसर्जन मिरवणूक मार्ग उजळून निघाला.अनेक मंडळांनी प्रशासनाच्या आवाहनाला प्रतिसाद देत मोठ्या ध्वनीयंत्रणेला फाटा दिला. त्याऐवजी झगमगीत प्रकाशरचनेला त्यांनी प्राधान्य दिले. लेसर लाईटमुळे प्रकाशाचा झगमगाट सर्वांनाच अनुभवयास मिळाला.हिंदवी, बीजीएम,पीटीएम, बुधवार पेठ, गोल सर्कल सह मोठ्या मंडळांनी आपापले ध्वज मिरवणुकीत आणले होते. पीटीएमच्या गणपतीसमोर फुटबॉलपटू उंदराने गणपतीला खांद्यावर घेतल्याची मूर्ती सर्वांचे लक्ष वेधून घेत होती. मंगळवार पेठेतील म्हसोबा मंडळाच्या मागून उडी मारलेल्या नंदीने अनेकांचे लक्ष वेधून घेतले. त्याच्याजवळ उभे राहून फोटो काढण्यासाठी लहान मुलांची गर्दी झाली होती.ज्यांच्याकडे मोठी ध्वनीयंत्रणा नव्हती अशा अनेकांनी मर्यादित यंत्रणा, बीटस, बेंजो,ढोल ताशा आणल्याने याच तालावर कार्यकर्त्यांनी आपली नाचायची हौस भागवून घेतली. महाव्दार रोड आणि पापाची तिकटी, गंगावेश मार्गावर विविध राजकीय पक्ष आणि संघटनांनी उभारलेल्या बूथवर सन्मानपूर्वक रीतीने मंडळाच्या पदाधिकाऱ्यांना बोलावून पानसुपारी दिली जात होती. यंदाच्या मिरवणुकीमध्ये फारसे वैविध्य किंवा बडेजाव नसणार हे माहिती असूनही नागरिकांनी मात्र रात्री उशिरापर्यंत मोठी गर्दी केली होती.ज्यांनी प्रकाश व्यवस्थेसाठी वेगळे नियोजन केले होते अशा मंडळांनी जरा अंधार झाल्यानंतरच आपला गणपती महाव्दार रोडवर यावा असे नियोजन केल्याचे दिसत होते. ज्या ठिकाणी मिरवणूक रेंगाळते असे वाटत होते त्या ठिकाणी जावून पोलिस अधिकारी संबंधितांना विनंती करून मिरवणूक पुढे नेत होते. काही ठिकाणी आवाज वाढवायची वेळ अधिकाऱ्यांवर आली.अगदी दोन, चार मंडळांनी मोठी ध्वनीयंत्रणा लावण्याचा प्रयत्न केला. परंतू पोलिसांनी तो हाणून पाडला. यातील काही मंडळांनी पानसुपारी स्वीकारण्यास नकार दिला. पोलिसांनी पापाची तिकटी येथे दोर बांधून गर्दीचे एकत्रीकरण टाळल्याने चेंगराचेंगरी झाली नाही. दुकानांच्या पायऱ्यांवर बसून नागरिकांनी मिरवणुकीचा आनंद लुटला.शूर आम्ही सरदार आम्हांलाचक्रव्यूह मंडळाचा गणपती १ वाजता पापाच्या तिकटीवर आला. यावेळी बीटसवर ‘शूर आम्ही सरदार, आम्हांला काय कुणाची भीती’ गीत वाजवण्यात आले. त्यामुळे वेगळेच वातावरण निर्माण झाले. याच दरम्यान शाहुपुरीतील शिवतेज मंडळाने आणलेल्या ढोल, ताशाने वातावरण जिवंत केले.