सांगली : नवीन वर्षाचे स्वागत करत असताना सामाजिक बांधिलकी जपण्याचा प्रयत्न शहरातील संघटनांनी केला. नववर्ष स्वागतासाठी शहरात ठिकठिकाणी ‘दारू नको, दूध प्या’ उपक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यास नागरिकांचा चांगला प्रतिसाद मिळाला, तर नववर्षाच्या पूर्वसंध्येला पोवाड्याच्या माध्यमातून व्यसनांच्या दुष्परिणामांची मांडणी नागरिकांसमोर करण्यात आली.३१ डिसेंबरला नववर्षाचे स्वागत करताना बेधुंद होऊन आनंद साजरा करण्याकडे तरुणांचा कल वाढत असल्याने त्यापासून त्यांना परावृत्त करण्यासाठी गेल्या काही वर्षांपासून उपक्रमाचे आयोजन करण्यात येत आहे. त्यानुसार ‘दारू नको, दूध प्या’ उपक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. शनिवारी सायंकाळी स्टेशन चौकात डी युवा शक्तीच्यावतीने विनायक रूपनर यांच्या पुढाकाराने उपक्रम राबविण्यात आला. यावेळी पोलिस उपअधीक्षक दीपाली काळे यांच्याहस्ते उपस्थितांना दुधाचे वाटप करत उपक्रमाची सुरुवात करण्यात आली. यावेळी शेखर इनामदार, सुब्राव मद्रासी यांच्यासह डी युवा शक्तीचे कार्यकर्ते उपस्थित होते. राष्ट्रवादी कॉँग्रेसच्यावतीने पक्ष कार्यालयासमोर हा उपक्रम राबविण्यात आला. तरुणांनी व्यसनांच्या आहारी न जाता दूध पिऊन सुदृढ राहावे, असे आवाहन यावेळी करण्यात आले. यावेळी राष्ट्रवादी कॉँग्रेसचे पदाधिकारी उपस्थित होते. राम मंदिर चौकात युवकांनी दुधाचे वाटप करत दारू न पिण्याचे आवाहन केले. सागर खोत, वाहिद कुरेशी, उमेश सोकटे, प्रदीप पाटील, संतोष शेंडगे आदी उपस्थित होते. (प्रतिनिधी)
‘दारू नको, दूध प्या’ उपक्रमास सांगलीमध्ये उत्स्फूर्त प्रतिसाद!
By admin | Published: December 31, 2016 11:19 PM