कोल्हापूर : छत्रपती संभाजीराजेंच्या जयंतीनिमित्त शाहू यूथ फौंडेशनच्यावतीने जुना राजवाडा परिसरात आयोजित केलेल्या ‘जागर इतिहासाचा’ या छायाचित्र प्रदर्शनास सलग दुसऱ्या दिवशी शनिवारी उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. शिवाजी महाराजांच्या शौर्याशी संबंधित असलेल्या २४० किल्ल्यांची छायाचित्रे या प्रदर्शनात मांडण्यात आली आहेत. छायचित्रातून जणू या किल्ल्यांवर भ्रमंती केल्याचा भास पाहणाऱ्याला होत आहे. यात जलदुर्गांमध्ये सिंधुदुर्ग, जंजिरा, विजयदुर्ग, पद्मदुर्ग, सुवर्णदुर्ग, खांदेरीसारख्या किल्ल्यांचा समावेश आहे. भूदुर्गामध्ये महाराजांनी दक्षिण दिग्विजय केलेले कर्नाटकातील जिंजी, गोजरा (तमिळनाडू), बडकसेरा(आंध्र प्रदेश), गोवळकोंडा, तसेच तोरणा, साल्हेर, मुल्हेर, राजगड, पाली, रांगणा, पावनगड, वसंतगड, कल्याणगड, प्रतापगड, अजिंक्यतारा, कंधार अशा अनेक किल्ल्यांचा त्यामध्ये समावेश आहे. या चित्रप्रदर्शनास स्थानिकांसह राज्यातून व परराज्यांतून करवीर निवासिनी अंबाबाई देवीच्या दर्शनासाठी आलेल्या हजारो पर्यटक भाविकांनी या गड-किल्ल्यांचे चित्र प्रदर्शन पाहण्याचा आनंद लुटला. विशेषत: सलग सुट्यांमुळे शनिवारी सकाळपासूनच या प्रदर्शनास भेट देणाऱ्यांंमध्ये युवा वर्गाचा अधिक सहभाग होता. यातून इतिहासाला उजाळा मिळाल्याची भावना अनेकांनी व्यक्त केली. रविवारी बुलेट रॅली स्वराज्याचे दुसरे छत्रपती संभाजीराजे यांनी १४० लढाया जिंकल्या. महाराजांचा पराक्रमी इतिहास लोकांपुढे आलेला नाही. आज, रविवारी सकाळी ७.३० वाजता छत्रपती संभाजीराजांच्या उत्सवमूर्ती सोबत पन्हाळगडावरील छत्रपती शिवाजी महाराजांच्या मंदिरापासून शंभू ज्योतीचे प्रस्थान होणार आहे. यात शिस्तबद्धरीत्या बुलेटधारक पारंपरिक पोशाखात हजारोंच्या संख्येने सहभागी होणार आहेत. या रॅलीत शंभू राजेंच्या कार्याबद्दलची माहिती, सामाजिक संदेश, समाज जागृती करणारे संदेश असणार आहेत. याशिवाय अग्रभागी रणरागिनींचाही समावेश असणार आहे. सकाळी ११ वाजता या रॅलीची सांगता भवानी मंडप येथे होणार आहे.
‘जागर इतिहासाचा’ छायाचित्र प्रदर्शनास उत्स्फूर्त प्रतिसाद
By admin | Published: May 13, 2017 4:23 PM