धामोड
धामोड (ता. राधानगरी) येथील ग्रुपग्रामपंचायत व भानोबा व्यापारी संघटना यांनी 'धामोड शटर डाऊन' या केलेल्या आवाहनाला आज चांगला प्रतिसाद मिळाला. त्यामुळे आजच्या आठवडी बाजाराबरोबर व्यापार पेठेतील सर्वच व्यवहार पूर्णपणे बंद होते. या परिसरातील हा मोठा आठवडी बाजार आहे. त्यामुळे परिसरातील जवळपास पंचवीस वाड्या-वस्त्यांतील लोक बाजारहाट करण्यासाठी येथे येत असतात. पोलीस प्रशासनानेही खबरदारी म्हणून सकाळी आठ वाजल्यापासून कडक पोलीस बंदोबस्त ठेवला होता.
राज्य सरकारने पुकारलेल्या जमावबंदी व संचारबंदीच्या आदेशाचे तंतोतंत पालन करण्याच्या उद्देशाने धामोड ग्रुपग्रामपंचायत व भानोबा व्यापारी संघटनेने 'धामोड शटर डाऊन'चे आवाहन केले होते. या आवाहनाला आज धामोडवासीयांनी शंभर टक्के प्रतिसाद दिला व सर्वच व्यवहार पूर्णपणे बंद ठेवले. त्यातच आज येथील आठवडी बाजार असल्याने येथे मोठी गर्दी होणार, याची शक्यता धरून आजचा बाजार बंद ठेवण्याचा निर्णय घेतला. पोलीस प्रशासनानेही खबरदारीचा उपाय म्हणून सकाळपासून कडक पोलीस बंदोबस्त तैनात ठेवला होता .
फोटो - धामोड (ता. राधानगरी) येथील आठवडा बाजाराच्या पार्श्वभूमीवर प्रशासनाच्यावतीने तैनात ठेवण्यात आलेला पोलीस बंदोबस्त. .
छाया - श्रीकांत ऱ्हायकर