कोरोनाचा प्रसार वाढू लागला आहे. त्यामुळे शासनाने दक्षता म्हणून वीकेंड लॉकडाऊन घोषित केला आहे. या वीकेंडला रविवारी दुसऱ्या दिवशी शिरोळ तालुक्यातून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. जयसिंगपूर, शिरोळ, कुरुंदवाड या शहरासह ग्रामीण भागात कडकडीत बंद होता. दरम्यान, लॉकडाऊनमुळे मुंबईकडे जाणारा भाजीपाला शनिवारी बंद होता. रविवारपासून तो पुन्हा सुरळीत झाला.
शिरोळ तालुक्यातील कोरोना रुग्णांची संख्या वाढत आहे. प्रशासन पातळीवर नागरिकांना कोरोनाचे नियम पाळण्याचे आवाहन केले जात आहे;मात्र विनाकारण फिरणाऱ्यांची संख्या व गर्दी बाजारात दिसून येत आहे. त्यामुळे कोरोनाची साखळी रोखण्यासाठी अत्यावश्यक सेवा वगळता व्यवहार बंद ठेवण्याचे आदेश दिले.
रविवारी शहरातील क्रांती चौक यासह ठिकठिकाणी पोलिसांचा बंदोबस्त होता. विनामास्क फिरणाऱ्यांवर कारवाई सुरू होती. बस बंद राहिल्याने बसस्थानकावर शुकशुकाट होता. कुरुंदवाड व शिरोळ शहरात व्यापारी, व्यावसायिकांनी आपले संपूर्ण व्यवहार बंद ठेवल्याने शहरात शुकशुकाट पसरला होता. कुरुंदवाड पोलीस व पालिका प्रशासनाने शहरातील प्रमुख चौकात गस्त घालत विनामास्क व विनाकारण फिरणाऱ्यांवर दंडात्मक कारवाई केली. दरम्यान, रविवार असल्याने नागरिकांनी घरातच राहणे पसंत केले.
फोटो - ११०४२०२१-जेएवाय-०३
फोटो ओळ - जयसिंगपूर येथे नेहमी गजबजणाऱ्या क्रांती चौकात रविवारी शुकशुकाट होता. (छाया - अजित चौगुले, उदगाव)