कोल्हापूर : कोल्हापूर शहरात सोमवारी दिवसभरात ढगाळ वातावरण राहिले. सकाळच्या टप्प्यात पावसाच्या तुरळक सरी कोसळल्या. मात्र, जिल्ह्यात काही ठिकाणी जोरदार पाऊस झाला. आगामी दोन दिवस जिल्ह्यात जोरदार पाऊस राहील, असा हवामान विभागाचा अंदाज आहे.बंगालच्या खाडीत कमी दाबाचा पट्टा तयार झाल्याने संपूर्ण राज्यात पाऊस सुरू आहे. कोल्हापूर जिल्ह्यात गेली तीन-चार दिवस जोरदार पाऊस कोसळत आहे. रविवारी रात्री अनेक ठिकाणी ढगफुटीसारखा पाऊस झाल्याने पिकांचे मोठे नुकसान झाले आहे.
काढणीस आलेले खरीप पिके धोक्यात आली आहेत. भात पीक जमीनदोस्त झाले असून त्यावर फूटभर पाणी उभारल्याने शेतकरी हवालदिल झाला आहे. परतीचा पाऊस पाठ सोडत नसल्याने हातातोंडाला आलेली पिके काढायची कशी? या चिंतेत शेतकरी आहेत.सोमवारी सकाळपासून जिल्ह्यात ढगाळ वातावरण राहिले. गडहिंग्लज, राधानगरी परिसरात जोरदार पाऊस झाला. काही ठिकाणी हलक्या सरी कोसळल्या. कोल्हापूर शहरात दिवसभर वातावरण ढगाळ राहिले. सकाळच्या टप्प्यात पावसाची भुरभुर राहिली. मात्र, दुपारी काही काळ ऊन होते. त्यानंतर आकाश गच्च झाले. सायंकाळी पावसाच्या सरी कोसळल्या. आज, मंगळवार व उद्या, बुधवारी जिल्ह्यात जोरदार पावसाचा अंदाज हवामान विभागाने वर्तविला आहे.