कोल्हापूर : वाजवी व योग्य किमतीमध्ये विविध सुविधांनी परिपूर्ण गृहप्रकल्पांमध्ये चांगले पर्याय ग्राहकांना उपलब्ध करून देण्यासाठी; तसेच नवनवीन बांधकाम साहित्य, सेवा, तंत्रज्ञान, कल्पना, अर्थसाहाय्याच्या योजना ग्राहकांपर्यंत पोहोचविण्याबरोबरच सभासदांनाही स्वत:च्या क्षेत्राविषयी सजग ठेवण्यासाठी ‘क्रिडाई, कोल्हापूर’च्यावतीने बांधकामविषयक ‘दालन २०१६’ या प्रदर्शनाचे आयोजन केले आहे, अशी माहिती ‘क्रिडाई’चे अध्यक्ष महेश यादव यांनी पत्रकार परिषदेत दिली. येथील शाहूपुरी जिमखाना मैदान येथे दि. २९ जानेवारी रोजी सकाळी १० वाजता या दालनाचे उद्घाटन मान्यवरांच्या हस्ते होत आहे. १ फेब्रुवारी २०१६ पर्यंत या ‘दालन २०१६’ बांधकामविषयक प्रदर्शनाचे आयोजन केले आहे. या प्रदर्शनाचा उभारणी समारंभ बुधवारी छत्रपती शाहू महाराज यांच्या हस्ते व ‘क्रिडाई’चे माजी अध्यक्ष बाळ पाटणकर यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाला; तर स्टॉल उभारणीचेही काम सुरू करण्यात आले आहे. उद्घाटनाचा समारंभ मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते व पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांच्या अध्यक्षतेखाली तसेच नगरविकास राज्यमंत्री रणजित पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत करण्याचा आमचा प्रयत्न असल्याचेही अध्यक्ष महेश यादव यांनी सांगितले. या ‘दालन २०१६’ या प्रदर्शनाविषयी बोलताना महेश यादव म्हणाले, क्रिडाई, कोल्हापूर या बांधकाम व्यावसायिक संघटनेतर्फे दर तीन वर्षांनी पश्चिम महाराष्ट्रातील सर्वांत भव्य असे बांधकामविषयक प्रदर्शन गेली २७ वर्षे सातत्याने आयोजित केले जाते. कोल्हापूर आणि परिसरातील ग्राहकांना एकाच छताखाली बांधकामविषयी सर्व अंगांची अधिकृत व सखोल माहितीही होऊन घरांचे स्वप्न प्रत्यक्षात उतरविण्यास या प्रदर्शनाचा मोठा हातभार लागतो. या दालनामध्ये १६३ स्टॉल असून सर्व स्टॉलचे बुकिंग झाले असून त्यांपैकी क्रिडाई कोल्हापूरच्या ८२ सभासदांनी आपले स्टॉल बुक केले आहेत. या प्रदर्शनामुळे निकोप स्पर्धा वाढीस लागून ग्राहकांना परिपूर्ण गृहप्रकल्पांमध्ये चांगले पर्याय उपलब्ध होतात. लकी ड्रॉची संकल्पना या वेळेसह उपलब्ध असून प्रदर्शनकाळात बुकिंग करणाऱ्या ग्राहकांना टी. व्ही., मोटारसायकल, सोबत बंपर बक्षीस म्हणून फोर व्हीलर जिंकण्याची संधी ‘दालन २०१५’ मध्ये असणार आहे. तसेच फ्लॅट बुकिंग करणाऱ्यांना एक गिफ्ट देण्यात येणार आहे. या प्रदर्शनप्रसंगी ३० जानेवारी रोजी डॉ. एल. एस. जयागोपाल यांचा ‘हाय राईज बिल्डिंग्ज डिझायनिंग आणि कन्स्ट्रक्शन’ हा टेक्निकल सेमिनार होणार आहे, अशी माहिती ‘दालन’चे चेअरमन कृष्णा पाटील व समन्वयक चेतन वसा यांनी यावेळी दिली. या पत्रकार परिषदेस क्रिडाई महाराष्ट्रचे उपाध्यक्ष राजीव परीख, क्रिडाई, कोल्हापूरचे उपाध्यक्ष सुजय होसमणी, सचिव विद्यानंद बेडेकर, ‘दालन’चे सचिव संजय डोईफोडे, आदी उपस्थित होते. (प्रतिनिधी)
‘क्रिडाई’तर्फे ‘दालन २०१६’
By admin | Published: December 31, 2015 12:41 AM