कोल्हापूर : कोल्हापूर शहरासह जिल्ह्यातील काही तालुक्यांत वळीव पावसाने चांगली हजेरीही लावली आहे. शहरात बुधवारी सायंकाळी सातच्या सुमारास पावसाचा शिडकावा झाला. कोल्हापूर शहरात आकाशात ढगांची गर्दी झाली होती. कोणत्याही क्षणी पाऊस सुरू होईल, असे वातावरण तयार झाले होते. मात्र मोठ्या पावसाने चकवा दिला. दरम्यान, शिडकाव्यामुळे काही काळ हवेत गारवा निर्माण झाला होता. आठ दिवसांपासून हवेत प्रचंड उष्मा होता. त्यामुळे वळिवाच्या पावसाची प्रतीक्षा होती. बुधवारी दिवसभर आकाशात ढग जमले होते. सात वाजता पावसाच्या हलक्या सरी कोसळण्यास प्रारंभ झाला. पादचारी, दुचाकीस्वार यांची तारांबळ उडाली. इचलकरंजीत वळवाची हजेरीइचलकरंजी : गेले काही दिवस हुलकावणी देणाऱ्या वळीव पावसाने बुधवारी सोसाट्याच्या वाऱ्यासह सुमारे अर्धातास जोरदार हजेरी लावली. अचानक पावसाच्या मोठ्या सरी कोसळू लागल्याने रस्त्यावरील वाहतूक ठप्प झाली. तर रस्त्याच्या कडेला बसून भाजीपाला व फळफळावळ विक्रेत्यांची तारांबळ उडाली. महावितरण कंपनीने दोन तास विद्युतपुरवठा खंडित केला. गडहिंग्लज तालुक्यातही हजेरीगडहिंग्लज : गत आठ दिवस तीन-चार वेळा हुलकावणी दिलेल्या वळीव पावसाने गडहिंग्लजला बुधवारी सायंकाळी ७ वाजता तासभर झोडपून काढले. जोरदार वारा, विजेच्या कडकडाटासह पावसाला सुरुवात झाली. तालुक्यातील ग्रामीण भागात पडलेल्या पावसामुळे बळिराजाच्या आशा पल्लवीत केल्या.उत्तूरला पावसाची हजेरी; प्रचार खोळंबलाउत्तूर : आजरा कारखान्याच्या निवडणुकीत उत्तूर-मडिलगे गटात प्रचाराच्या रणधुमाळीने वातावरण तापले असताना बुधवारी रात्री साडेसातच्या सुमारास दमदार पावसाने हजेरी लावल्याने उमेदवारांसह कार्यकर्त्यांचा प्रचार खोळंबला. या पावसाने राजकारणातील तापलेले वातावरण थंड केले. शेतीकामास प्रचाराच्या रणुधमाळीतही वेग आला आहे. बहिरेवाडी, मुमेवाडी, आर्दाळ परिसरात पाऊस झाला, तर चव्हाणवाडी, चिमणे, वडकशिवाले परिसरात पावसाने हुलकावणी दिली. आजरा शहरातही पावसाने हजेरी लावल्याने सभेची तारांबळ उडाली. दरम्यान, महाआघाडीची सभा पावसातही सुरू होती.
जिल्ह्यात पावसाचा शिडकावा
By admin | Published: May 19, 2016 12:37 AM