इचलकरंजी : येथील पालनकर ज्वेलर्स या सराफी दुकानावर दरोडा टाकून साडेचार कोटी रुपयांचे सोन्या-चांदीचे दागिने लुटल्याच्या घटनेला ३६ तास उलटले तरी दरोड्याबाबत कोणतेही धागेदोरे पोलिसांच्या हाती लागलेले नाहीत. कर्नाटक राज्यासह गोवा व महाराष्ट्रात पोलिसांची तपास पथके रवाना झाली आहेत.पालनकर ज्वेलर्स या दुकानातून चौदा किलो सोन्याचे दागिने, २८५ किलो चांदीचे दागिने व चीजवस्तू, दोन लाख रुपयांची रोकड व पाच लाख रुपयांचे हिरे चोरीला जाण्याची शहराच्या इतिहासातील पहिलीच घटना असल्याने रविवारीही दिवसभर या दुकानासमोर गर्दी होती. तसेच शहरभर दरोड्याची चर्चा होती.दरोडा पडल्यानंतर त्या गल्लीमध्ये असलेल्या विविध ठिकाणच्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यांचे फुटेज पोलिसांनी तपासासाठी घेतले आहेत. या फुटेजमध्ये संशयास्पदरीत्या एक मोटारसायकल फिरताना आढळून आली आहे. दरोड्याच्या ठिकाणापासून चांदणी चौकापर्यंत दरोडेखोर पायी चालत गेले. त्यांनी दागिने नेताना ट्रेचा वापर केला असल्याने ट्रेमधून काही दागिने खाली पडले. त्यातील सोन्याच्या झुब्यांची एक जोडी नंतर पोलिसांना मिळाली आहे. तसेच चांदणी चौकामध्ये एक ट्रॅक्स उभी असल्याचेही येथील काही नागरिकांचे म्हणणे होते. या ट्रॅक्सचा उपयोग दरोडेखोरांनी केला असावा. तसेच ते जवळच असलेल्या कर्नाटक राज्यात पळाले असावेत, असा पोलिसांचा संशय आहे. पोलिसांची दोन पथके बंगलोर व बागलकोट या भागात गेली आहेत. याशिवाय गोवा व महाराष्ट्रातील काही ठिकाणी अ२ाणखी चार पथके रवाना झाली आहेत.त्यांच्याकडून अद्यापपर्यंत कोणत्याही प्रकारचा सुगावा मिळत नसल्याने पोलीससुद्धा आश्चर्यचकित झाले आहेत. कामगारांचीही चौकशीपोलिसांनी या सराफी दुकानात काम करणाऱ्या चौघा कामगारांची रविवारी दिवसभर कसून चौकशी केली. मात्र, त्यांच्याकडून कोणतीही माहिती मिळाली नाही. तसेच आणखी एक कामगार पश्चिम बंगालला गेला असून, तो तेथेच असल्याची खात्री पोलिसांनी करून घेतली आहे. तरीसुद्धा त्याच्या मोबाईल संचावरील ‘कॉल डिटेल्स’ काढून ते तपासले जाणार आहेत.दरोडेखोर माहीतगार?हा दरोडा अत्यंत नियोजनबद्धरीत्या टाकण्यात आला आहे. पालनकर ज्वेलर्स दुकानाचा परिसर आणि त्यांचे दुकान व निवासस्थान याचा अभ्यास केला असावा. लूट करताना त्यांच्या हालचाली सफाईदारपणे व यापूर्वी वावर असलेल्याप्रमाणे होत होत्या, यावरून दरोडेखोर हे माहीतगार असावेत, असा पोलिसांचा संशय आहे.
महाराष्ट्रासह कर्नाटक, गोव्यात पथके रवाना
By admin | Published: March 30, 2015 12:30 AM