कोल्हापूर : अमेरिकन डॉलर बदलून देण्याच्या बहाण्याने कोल्हापुरातील व्यापाºयाला १० लाख ६० हजारांचा गंडा घालणाऱ्या भामट्याच्या शोधासाठी रविवारी दोन पथके केरळ, बंगलोरला रवाना झाली. संशयित स्टीव्ह गॉडवीन डी. (रा. राममूर्तीनगर, बंगलोर) असे त्याचे नाव आहे.अशा प्रकारे पुणे, मुंबईमध्ये व्यापाऱ्यांना गंडा घालणारा केरळ येथील सराईत गुन्हेगार पिल्ले (पूर्ण नाव नाही) हा आहे. त्याचा फोटो संशयित भामट्याशी मिळताजुळता आहे. त्यामुळे संशयित गुन्हेगार तोच आहे का, याची खात्री पोलीस करीत आहेत, अशी माहिती शाहूपुरीचे पोलीस निरीक्षक संजय मोरे यांनी दिली.बंगलोरमधील भामटा स्टीव्ह डी. याने व्यापारी सुनील भूपाल सन्नके (रा. शाहूपुरी तिसरी गल्ली) यांना १५ हजार अमेरिकन डॉलरचे परकीय चलन बदलून पाहिजे असल्याचे सांगितले. त्या बदल्यात त्यांच्याकडून १० लाख ६० हजार रुपये घेऊन तो हॉटेलमधून पसार झाला.हॉटेलमधील सीसीटीव्ही फुटेजमध्ये हा भामटा अस्पष्टपणे दिसत आहे. अशाच प्रकारची फसवणूक करणारा केरळ येथील सराईत गुन्हेगार पिल्ले हा आहे. त्याच्यावर पुणे येथील पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल आहेत. त्याचा फोटो सन्नके यांना दाखविला असता त्यांनी तो असाच दिसत होता, असे सांगितल्याने पिल्लेवर संशय बळावला आहे.
खोटे नाव सांगून तो फिरत असतो. त्याच्या शोधासाठी पोलिसांनी दोन पथके केरळ व बंगलोरला रवाना केली. सन्नके यांच्या मोबाईलवर आलेला भामट्याचा क्रमांक बंद असल्याचे सांगितले जात आहे. त्यामुळे त्याचे लोकेशन आढळून येत नाही. तो क्रमांक दुसऱ्या व्यक्तीच्या नावावर आहे.परदेशी भामट्यांचा वावरइचलकरंजीतील बांधकाम व्यावसायिकास परदेशी चलन दुप्पट करण्याचे आमिष दाखवून ६३ लाखांची फसवणूक करण्याचा प्रयत्न करणारा परदेशी गुन्हेगार मुथाय इसाह (४५, रा. कॉलेज रोड, युनायटेड नेशन अॅव्हेन्यूजवळ, नैरोबी, केनिया) याच्या मुसक्या पोलिसांनी काही महिन्यांपूर्वी आवळल्या होत्या.
त्याने सोशल मीडियावरून मुंबई, पुणे, कोल्हापूर, इचलकरंजी परिसरांत ज्यांचे आर्थिक व्यवहार मोठे आहेत, त्यांची यादी तयार केली होती. त्यानंतर त्याने कोल्हापुरातील याच आलिशान हॉटेलमध्ये येऊन गंडा घालण्याचा प्रयत्न केला केला. कोल्हापुरात परदेशी भामट्यांचा वावर वाढला आहे.