नृसिंहवाडी : 'दिगंबरा दिगंबरा' च्या अखंड भजनात व श्री गुरुदेव दत्तच्या गजरात नृसिंहवाडीतील कृष्णा-पंचगंगा संगमतीर्थावर भक्तीमय वातावरणात काल, बुधवारी सायंकाळी पाच वाजता श्री दत्त जन्मकाळ सोहळा मोठ्या उत्साहात संपन्न झाला. यावेळी भाविकांनी मोठी गर्दी केली होती.दत्त जयंतीनिमित्त दत्त मंदिरात अनेक धार्मिक कार्यक्रम झाले. मंदिरात पहाटे साडेतीन वाजता काकड आरती व षोडशोपचार पूजा, सकाळी सात ते बारा यावेळेत अनेक भक्तांनी ‘श्री ना’ पंचामृत अभिषेक पूजा केली.दुपारी साडेबारा वाजता श्रींच्या चरणकमलावर महापूजा झाली. त्यानंतर प्रसाद वाटप करण्यात आला.
दुपारी तीन वाजता येथील ब्रम्हवृंदा मार्फत पवमान पंचसुक्त पठन झाले. साडेचार वाजता श्रींची उत्सवमूर्ती श्री नारायणस्वामी महाराज यांचे मंदिरातून वाजत गाजत मुख्यमंदिरात आणण्यात आली. ह.भ.प रोहित दांडेकर यांच्या कीर्तनानंतर ठीक पाच वाजता धार्मिक वातावरणात लाखो भाविकांच्या उपस्थितीत धार्मिक वातारणात मोठ्या उत्साहात विधिवत श्री दत्तजन्मकाळ सोहळा संपन्न झाला. जन्मकाळ सोहळ्यासाठी चांदीचा पाळणा विविध रंगाच्या फुलांनी आकर्षक सजविला होता. भाविकांनी सजविलेल्या पाळण्यावर अबिर, गुलाल व फुलांची मुक्तहस्ताने उधळण केली. जन्मकाळानंतर येथील दत्त मंदिरात पारंपारिक पाळणागीते व आरती व प्रार्थना करण्यात आली. रात्री दहा नंतर मंदिरात धूप, दीप,आरती व पालखी सोहळा पार पडला. गुरुदत्त शुगरचे माधवराव घाडगे यांनी यांनी श्री दत्त देव संस्थानला महाप्रसादासाठी दोन लाखाची देणगी दिली.जन्मकाळ सोहळ्यासाठी महाराष्ट्रसह गुजराथ, कर्नाटक, गोवा आदी अनेक राज्यातून लाखो भाविक आले होते. दत्त देव संस्थानचे विश्वस्त, ग्रामपंचायत चे सदस्य, शासकीय अधिकारी, जीवनमुक्ती संघटना कोल्हापूर, एस के पाटील व दत्त महाविद्यालय कुरुंदवाड व श्री दत्त विद्या मंदिर हायस्कूल चे विधार्थी स्वयंसेवकांनी तसेच दत्त देव संस्थान व ग्रामपंचायत चे कर्मचारी व स्वयंसेवकांनी अधिक परिश्रम घेऊन यात्रेचे नेटके नियोजन केले.