सतीश पाटीलशिरोली : पुणे-बंगळूर राष्ट्रीय महामार्गावर टोप-संभापूरजवळ टोयोटा शोरुम जवळ कर्नाटक डेपोची एसटी बस उलटून झालेल्या अपघातात एक ठार तर सहा प्रवासी जखमी झाले. जखमींना कोल्हापुरातील सीपीआर रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. काल, सोमवारी (दि.१२) रात्री उशिरा हा अपघात झाला.सुधीर भाऊसाहेब पाटील (वय ३२ रा. कुर्ली, ता.निपाणी, जि. बेळगाव) असे मयताचे नाव आहे. तर मौला आबालाल बागवान, (रा. चिक्कोडी), रोहिणी मारूती कदम (रा.बसर्गे), इश्या बाळासाहेब कांबळे (रा. पुणे), चंद्रशेखर लक्ष्मण गावडे (रा पुणे), रूकय्या बाळून हुसेन सौदागर (रा. बेळगांव), वाहक रविकुमार अशी जखमींची नावे आहेत.याबाबत पोलीस ठाण्यातून मिळालेली अधिक माहिती अशी, हुबळीहून मुंबईकडे कर्नाटक डेपोची एसटी बस निघाली होती. रात्री १२ च्या सुमारास टोप गावच्या हद्दीत टोयोटा शोरुम येथे दुसऱ्या वाहनाला ओव्हरटेक करताना चालकाला रात्रीच्या वेळी रस्त्याचा अंदाज आला नसल्याने भरधाव वेगाने जाणारी एसटी बस महामार्गाच्या कडेला असलेल्या मोठ्या दगडावर जाऊन आदळली. दरम्यान चालकाचा बसवरील ताबा सुटल्याने बस महामार्गावरुन सेवा मार्गावर जाऊन पलटी झाली.रात्री १२ च्या सुमारास अपघात झाल्याने प्रवाशांत एकच गोंधळ उडाला. अपघाताची माहिती मिळताच शिरोली पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत बस मधुन प्रवाशांना बाहेर काढले. जखमी प्रवाशांना रुग्णवाहिकेतून उपचारासाठी सीपीआर मध्ये पाठविले आणि बस क्रेनच्या सहाय्याने सरळ केली. अपघाताची नोंद शिरोली पोलीस ठाण्यात झाली आहे.
कोल्हापूर: ओव्हरटेक करताना अंदाज चुकला; एसटी बस उलटून एक ठार तर सहा प्रवासी जखमी
By ऑनलाइन लोकमत | Published: September 13, 2022 6:24 PM