अर्जुनवाड : हसूर-जयसिंगपूर मार्गावर नियमित वेळेत एस. टी. बसची सुरळीत वाहतूक होत नसल्याने हसूर (ता. शिरोळ) येथील संतप्त झालेल्या विद्यार्थ्यांनी सोमवारी सकाळी तीन एस. टी. बस रोखून धरल्या. त्यामुळे शिरटी, हसूर परिसरातील ग्रामस्थांना याचा नाहक त्रास सहन करावा लागला.
शिरटी, हसूर परिसरातून शेकडो शालेय विद्यार्थी तसेच इतर नोकरदार वर्ग एस.टी.ने प्रवास करतात. मात्र, गेल्या अनेक दिवसांपासून एस. टी. वाहतूक सुरळीत होत नसल्याने विद्यार्थी तसेच कामावर जाणाऱ्या नोकरदार वर्गाला याचा त्रास सहन करावा लागत आहे. त्यामुळे संतप्त झालेल्या शालेय विद्यार्थ्यांनी सोमवारी एस.टी.बस रोखून धरल्या.
दरम्यान, कुरुंदवाड आगाराचे प्रतिनिधी घटनास्थळी दाखल झाल्यानंतर त्यांनी विद्यार्थ्यांच्या समस्या जाणून घेतल्या. तसेच स्थानिक पदाधिकाऱ्यांबरोबर दोन दिवसांत एस. टी. सेवा सुरळीत करण्याचे आश्वासन दिले. यावेळी ग्रा. पं. सदस्य अभिजीत पाटील, दीपक पाटील, नेमिनाथ कुमटाळे, रमेश चौगुले यांच्यासह ग्रामस्थ उपस्थित होते.
फोटो - १५०३२०२१-जेएवाय-०६
फोटो ओळ - हसूर (ता. शिरोळ) येथे विद्यार्थ्यांनी एस. टी. बस रोखून धरल्यामुळे काही काळ तणाव निर्माण झाला होता.