गडहिंग्लज : कडगाव (ता. गडहिंग्लज) येथे रस्त्यावर लावलेली टाटा पिकअप गाडी बाजूला घेण्यास सांगितल्याच्या कारणावरून चिडलेल्या एकाने चक्क बसमध्ये घुसून कंडक्टरला मारहाण केली. त्यामुळे संतप्त झालेल्या गडहिंग्लज आगाच्या चालकवाहकांनी दोन तास काम बंद ठेवून येथील पोलीस ठाण्यासमोर जोरदार घोषणाबाजी करून मारहाणीचा निषेध केला. आरोपीच्या अटकेनंतरच ते कामावर परतले. या घटनेमुळे गडहिंग्लज आगाराची बससेवा विस्कळीत झाली. दुपारी एकच्या सुमारास हा प्रकार घडला. या प्रकरणी दिलीप सदाशिव पाटील (वय ४९, रा. कडगाव, ता. गडहिंग्लज) याला पोलिसांनी अटक केली आहे.पोलीस व घटनास्थळावरून मिळालेली माहिती अशी : दुपारी पावणेएकच्या सुमारास गडहिंग्लज आगाराची आरळगुंडी-गडहिंग्लज ही बस कडगाव बसस्टॅन्डवर आली. त्यावेळी आंबेडकर पुतळ्यानजीक दिलीप पाटील याने आपली टाटा एस (एम एच ०९-सीयु १२२०) ही गाडी रस्त्यावरच लावली होती. बस पुढे नेण्यासाठी वाट नसल्यामुळे बसचालकाने त्यास गाडी बाजूला घेण्यास सांगितले. मात्र त्याने ऐकले नाही. बसचे वाहक मारुती रामा नाईक (रा. कडलगे) यांनीही खाली उतरून त्याला विनंती केली. तरीदेखील त्याने गाडी काढली नाही. बसमधील प्रवासी व आजूबाजूच्या नागरिकांचेदेखील त्याने ऐकले नाही. चिडून त्याने बसमध्ये घुसून कंडक्टरची कॉलर धरून शिवीगाळ करत मारहाण केली. चष्म्यावर बुक्की बसल्याने चष्म्याची काच फुटून कंडक्टरच्या नाकाला जखम झाली. त्यामुळे बसगाडी घटनास्थळी सोडून त्यांनी गडहिंग्लजला धाव घेतली. कडगाव येथील प्रकार कळताच गडहिंग्लज आगारातील संतप्त चालक-वाहकांनी काम बंद करून पोलीस ठाणे गाठले. आरोपीला त्वरित अटक करून त्याच्यावर कठोर कारवाईची मागणी केली. पोलीस ठाण्यासमोर ठिय्या मांडून जोरदार घोषणाबाजी केली.कडगाव ग्रामस्थ व पोलिसांची विनंतीदेखील त्यांनी धुडकावून लावली. त्यामुळे पोलिसांनी आरोपीला अटक केली. घटनास्थळी सपोनि सोमनाथ दिवटे, आगारप्रमुख सुनील जाधव यांनी भेट दिली.
एस.टी. कंडक्टरला मारहाण
By admin | Published: January 26, 2015 12:21 AM