कोल्हापूर : सभासद कामगारांना मिळणारा लाभांश, बँकेवर लोकशाही पद्धतीने सल्लागारांची नेमणूक, अशा विविध मुद्द्यांवर तसेच तीन कामगार संघटनांमध्ये असलेल्या मतभेदांच्या पार्श्वभूमीवर मंगळवारी एस. टी. सहकारी बँकेची वार्षिक सभा गोंधळातच पार पडली. मार्केट यार्ड येथील शाहू सांस्कृतिक भवन येथे झालेल्या या सभेच्या अध्यक्षस्थानी बँकेचे व्यवस्थापकीय संचालक रणजितसिंह देओल होते. व्यासपीठावर मान्यताप्राप्त कामगार संघटनेचे संचालक मंडळ व पदाधिकारी उपस्थित होते.सभेच्या सुरुवातीलाच सभासद नसलेल्या व्यक्तींनी सभागृहाबाहेर जावे, अशी सूचना देण्यात आली. मात्र, एस. टी. इंटक कामगार संघटना व महाराष्ट्र एस. टी. कामगार सेनेचे सभासद यावेळी उपस्थित असल्याने सभेची सुरुवातच गोंधळात झाली. संचालक सुहास खासबनीस यांनी मागील वर्षीचा नफा-तोटा मंजूर, नफा विभागणी, लाभांश मंजुरी, लेखापरीक्षण अहवाल स्वीकृती हे विषय वाचले. मात्र, त्यांना थांबवत यंदा लाभांश किती देणार? अशी विचारणा सभासद करू लागले. या गोंधळामुळे सभा काही काळ तहकूब करण्यात आली. त्यावर महाराष्ट्र मान्यताप्राप्त एस. टी. कामगार संघटनांशी संबंधित काही सभासदांनी बँकेची स्थिती भक्कम व पारदर्शी असल्याचे सांगितले. मात्र, विरोधी गटातील सभासद त्यांचा हा मुद्दा खोडून काढत होते. बँकेतर्फे दरवर्षी १५ टक्के लाभांश जाहीर केला जातो. मात्र, यंदा १३.४५ टक्के लाभांश देणार असल्याचे मत संचालकांनी व्यक्त केले. त्यावर उपस्थित सभासदांनी आक्षेप घेतला आणि पुन्हा आरडाओरड सुरू झाली. त्यातच बँकेच्या स्थानिक शाखांमध्ये संचालकांच्या मान्यतेने स्थानिक सल्लागार नेमण्याचा ठराव संचालकांनी मांडला. त्यावर एस.टी. इंटक कामगार संघटना व एस.टी. कामगार सेनेने विरोध करीत सल्लागारांची नेमणूक लोकशाही पद्धतीने निवडणूक घेऊन करावी, अशी मागणी केली. त्यातून मार्ग काढण्यासाठी त्यावर मतदान घेण्यात आले. त्यात संचालकांच्या बाजूने ४६५ मते पडली, तर विरोधी गटाच्या बाजूने ४८८ मते पडली. त्यामुळे स्थानिक सल्लागारांची नेमणूक लोकशाही पद्धतीने करण्याचा ठराव करण्यात आला. गोंधळातच अन्य ठराव करण्यात आले. वर्चस्ववाद, कामगारांच्या करारासह विविध मुद्द्यांवर गेल्या काही दिवसांपासून कामगार संघटनांमध्ये धुसफुस सुरू आहे. त्या वादाचे सावट या वार्षिक सभेवर दिसून आले. (प्रतिनिधी)
एस.टी. बँकेच्या सभेत गोंधळ
By admin | Published: August 31, 2016 12:27 AM