कोल्हापूर : एस.टी.ची जनतेच्या हिताची व्यवस्था मोडून खासगीकरणाचा डाव राज्यात खेळला जात आहे. त्यामुळे राज्य सरकारने एस.टी. महामंडळाचे राज्य शासनात विलीनीकरणाचे धोरण जाहीर करावे. या मागणीसाठी सोमवारी कामगार संघटना संयुक्त कृती समितीच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला. यात हजारांहून अधिक संपकरी एस.टी. कर्मचारी कुटुंबीयांसह सहभागी झाले होते.मोर्चाची सुरुवात मध्यवर्ती बसस्थानकासमोरून झाली. स्टेशन रोड, असेम्बली रोड, जिल्हाधिकारी कार्यालय येथे आला. मोर्चा जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आल्यानंतर कर्मचाऱ्यांनी शासनविरोधी घोषणा देत परिसर दणाणून सोडला. त्यानंतर श्रमिकचे अध्यक्ष अतुल दिघे, सीटूचे सुभाष जाधव, आयटकचे दिलीप पवार, उदय नारकर यांनी मनोगत व्यक्त करीत एस.टी. संपाला पाठिंबा दिला. शिष्टमंडळाने जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांना आदी मागण्यांचे निवेदन दिले.यात विलीनीकरणाच्या मागणीची सहानभूतीपूर्वक चर्चा करण्याचे मान्य करा. एसटीचे खासगीकरण थांबवण्याची व झालेले खासगीकरण परत फिरवण्याचे धोरणात्मक घोषणा करा. कर्मचाऱ्यांवरील बडतर्फी, निलंबन, रोजंदारी कर्मचाऱ्यांची सेवा समाप्ती अशा कारवाया मागे घ्या. आदी मागण्या करण्यात आल्या.यावेळी संपकरी एस.टी. कर्मचाऱ्यांतर्फे संजय घाटगे, रामचंद्र मुंडे, संतोष शिंदे, उत्तम पाटील, जोतिबा पाटील, अमोल चांदेकर, गणेश शेंडबाळे, किशोर शिंगाडे, जावेद जमादार, दीपक कराड, विवेकानंद मेंडके, संगीता केंद्रे, राजनंदिनी गावडे, दीपा कांबळे, विद्या होडगे, साधना सुतार आदी उपस्थित होते.
ST Strike: विलीनीकरणाचे धोरण जाहीर करा, एस.टी. कर्मचाऱ्यांचा जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा
By ऑनलाइन लोकमत | Published: February 14, 2022 5:05 PM