कोल्हापूर : राज्यभरातील एसटीच्या ९८ हजार कर्मचाऱ्यांचे जुलै महिन्याचे वेतन ऑगस्ट संपत आला तरी अजूनही मिळालेले नाही. यात कोल्हापूर विभागाचा विचार करता ४८०० कर्मचाऱ्यांचा समावेश असून, कर्मचाऱ्यांना अनेक आर्थिक अडचणींना तोंड द्यावे लागत आहे. त्यामुळे कर्मचाऱ्यांमधून संतप्त भावना व्यक्त होत आहे.
कोरोना आणि निर्बंधामुळे एसटीचे उत्पन्न घटले. त्यामुळे गेल्या वर्षभरापासून कर्मचाऱ्यांना पगार देणे कठीण झाले आहे. एसटीला दिवसाचा खर्च भागविणेही कठीण बनले आहे. मागील वर्षीही बिकट परिस्थिती बनली होती. त्यातही राज्य शासनाने मार्ग काढला. पुन्हा दुसरी कोरोना लाट आली. त्यातही प्रवासी आणि उत्पन्न वाढले नाही. त्यामुळे आता जुलै महिन्यापासून पुढे वेतन व अन्य खर्चासाठी एसटीच्या तिजोरीत खडखडाट आहे. परिणामी, राज्यातील ९८ हजार कर्मचाऱ्यांचे जुलैचे वेतन अद्याप झालेले नाही. कोल्हापूरचा विचार करता विभागात ४८०० कर्मचारी आहेत. या सर्वांचा दोन महिन्यांचा पगार सुमारे ९ कोटी इतका होतो. दोन महिन्यांचा १८ कोटी इतका आहे. हा थकीत पगार लवकर मिळावा. याकरिता कर्मचाऱ्यांच्या संघटनाही प्रयत्न करू लागल्या आहेत. कर्मचारी जुलै आणि आता संपत आलेल्या ऑगस्ट महिना, असा दोन महिन्यांचा पगारच झाला नसल्यामुळे संतप्त झाले आहेत. संसाराचा गाडा कसा चालवायचा, असा प्रश्न कर्मचाऱ्यांना पडला आहे.
सतेज पाटील यांचा पुढाकार
परिवहन राज्यमंत्री सतेज पाटील यांनी कोरोनाच्या पहिल्या लाटेत कर्मचाऱ्यांचा पगारासाठी पुढाकार घेतला होता. त्यामुळे त्यांचे विलंबाने का होईना पगार झाले होते. दुसऱ्या लाटेतही त्यांनी पुढाकार घेतला असून, पुढील आठवड्यात बैठक घेऊन पगारावर तोडगा काढण्याचा प्रयत्न करणार आहेत.
प्रतिक्रिया
एसटी कर्मचाऱ्यांना जुलै महिन्याचा व आता संपत आलेला ऑगस्ट, असा दोन महिन्यांचा पगार प्रलंबित आहे. लाॅकडाऊनपासून राज्य शासनाने २२०० कोटींची मदत केली आहे. त्याप्रमाणे आताही शासनाने मदत करावी. पगारच नसल्याने कर्मचाऱ्यांना कुटुंब चालविणे कठीण बनले आहे.
-संजीव चिकुर्डेकर, विभागीय सचिव, महाराष्ट्र एसटी कर्मचारी काँग्रेस