कोल्हापूर : बऱ्याच उलाढाली आणि संघर्षानंतर एस. टी. कर्मचाऱ्यांना अखेर लक्ष्मीपूजनाच्या आदल्या दिवशी पगाराची रक्कम हातात पडली; पण बँकेने कर्जहप्ते कपात केल्याने निम्माच पगार हातात शिल्लक राहिला आहे. तब्बल तीन महिन्यांच्या प्रतीक्षेनंतर मिळालेल्या पगारामुळे झालेला आनंद एस.टी.च्या बँकेच्या कृतीमुळे रागात परावर्तित झाला.मार्चमध्ये लॉकडाऊन सुरू झाल्यापासून एस.टी.ची सेवा पूर्णपणे बंद झाली. जूनमध्ये अनलॉक सुरू झाल्यानंतर एस.टी. सेवा काही अटी शर्तींनी सुरू झाली; पण प्रतिसादाअभावी अजूनही ही सेवा गती घेताना दिसत नाही. सेवा पूर्णपणे सुरू नसल्याने साहजिकच उत्पन्नच नसल्याने मार्चपासूनचे कर्मचाऱ्यांचे पगार देण्याची महामंडळाची ऐपतही राहिली नाही. अखेर राज्य सरकारने केलेल्या मदतीमुळे दिवाळीच्या तोंडावर कर्मचाऱ्यांच्या थकीत पगाराचा प्रश्न काही अंशी मार्गी लागला.दोन महिन्यांचा पगार शुक्रवारी खात्यावर जमा झाला. मात्र हा आनंद क्षणिक ठरला. एस.टी कर्मचाऱ्यांसाठी असलेल्या बँकेने कर्जाचे व्याज व मुद्दलासाठीची रक्कम म्हणून सलग तीन हप्ते एका दमात कपात करून घेतले. त्यामुळे निम्म्याहूनही कमी रक्कम खात्यावर शिल्लक राहिली. यावरून कर्मचाऱ्यांनी संघटनेकडून विचारणा करण्यास सुरुवात केली.लॉकडाऊन काळातील आर्थिक परिस्थितीमुळे मार्च ते ऑक्टोबरपर्यंत हप्ते भरण्यास मुभा देण्यात आली होती. मार्चपासून जुलैपर्यंतचे व्याज घेतले आणि आता ऑगस्ट ते सप्टेंबर या पगारातून मुद्दल आणि व्याजाची कपात सुरूकेली आहे. राज्यात १ लाख १५ हजार एस.टी कर्मचारी आहेत. ९० टक्के कर्मचारी हे बँकेचे कर्जदार आहेत.
आता कर्मचाऱ्यांचा पगार १०० टक्के झाल्यानेच बँकेने हप्ते कपात करून घेण्यास सुरुवात केली आहे. कर्ज घेतले आहे, म्हटल्यावर हप्ते आज ना उद्या भरावेच लागणार आहेत; पण आता दिवाळी असताना ही कपात करणे चुकीचे होते. पुढील महिन्यातील पगारातून घेतले असते तर कर्मचाऱ्यांच्या रोषाला सामोरे जावे लागले नसते.- उत्तम पाटील, कार्याध्यक्ष, एस. टी. कामगार संघटना