कोल्हापूर : एस. टी. महामंडळाच्या राज्य अधिवेशनात सकारात्मक निर्णयाची ग्वाही मिळाल्याने आनंदित झालेल्या कर्मचाऱ्यांनी गुरुवारी (दि. १३) रात्री तपोवन मैदानावर चक्क रंगीत-संगीत पार्टी करून आनंदोत्सव केला. मात्र, त्यांच्याकडून पडलेले दारूच्या बाटल्यांचे खच, उघड्यावरच शौचविधी अन् अन्नाच्या नासाडीसह अस्वच्छतेने मैदान भरल्याने त्याचा मनस्ताप कोल्हापूरकरांना सहन करावा लागला.
संतप्त नागरिकांनी गारगोटीहून कोल्हापूरकडे येणाऱ्या एस. टी. बसेस अडवत संयोजकांवर कारवाईची मागणी केली. संघटनेच्या नेत्यांकडून दिलगिरीनंतर व स्वच्छता करून देण्याचे आश्वासन दिल्यानंतर या गाड्या मार्गस्थ झाल्या. यामुळे काही काळ गोंधळाचे वातावरण निर्माण झाले.कळंबा मार्गावरील तपोवन मैदानावर गुरुवारी (दि. १३) महाराष्ट्र एस. टी. कामगार संघटनेचे राज्य अधिवेशन आयोजित करण्यात आले होते. यासाठी विविध मंत्रिमहोदयांसह राज्यभरातून कर्मचारी आले होते. अधिवेशनामध्ये गेल्या अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेल्या मागण्यांबाबत सकारात्मक आश्वासन मिळाल्याने कर्मचाऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण होते. त्यांच्या आनंदाला पारावार उरला नाही. त्यामुळे या कर्मचाऱ्यांनी रात्री उशिरापर्यंत रंगीत-संगीत पार्टी करीत दारू ढोसली व रिकाम्या बाटल्या व्यासपीठासह संपूर्ण मैदानावर फेकून दिल्या. तसेच ठिकठिकाणी जेवण टाकल्याचे दिसून आले.
कहर म्हणजे या लोकांनी खेळाच्या मैदानावर अनेक ठिकाणी उघड्यावरच शौच केले. मैदानाशेजारीच शाळा असून त्या ठिकाणीही काही अतिउत्साही जणांनी हा प्रताप केला. ही बाब सकाळी या ठिकाणी फिरायला आलेल्या महिला, नागरिकांसह खेळाडूंच्या निदर्शनास आली. त्यांनी याबाबत संतप्त प्रतिक्रिया व्यक्त करीत गारगोटीहून कोल्हापूर व पुण्याकडे निघालेल्या चारहून अधिक एस.टी. बसेस अडवून ठेवल्या.
जवळपास तास-दीड तास या ठिकाणी गोंधळ सुरू होता. काही वेळातच या ठिकाणी पोलीस दाखल झाले. त्यांनी संतप्त नागरिकांना समजावत गाड्या सोडण्याची विनंती केली; परंतु नागरिकांनी संयोजकांवर कारवाईसह हे मैदान स्वच्छ केले जात नाही तोपर्यंत गाड्या न सोडण्याचा पवित्रा घेतला.
हे समजताच नगरसेवक शारंगधर देशमुख, विजयसिंह खाडे-पाटील, भाजपचे महानगर जिल्हाध्यक्ष राहुल चिकोडे, कॉँग्रेसचे कार्यकर्ते दुर्वास कदम, धीरज पाटील ही या ठिकाणी आले. यामुळे गोंधळाचे वातावरण निर्माण झाले. परिस्थिती आवाक्याबाहेर जाऊ नये यासाठी पोलिसांनी एस.टी. संघटनेचे नेते व संयोजक उत्तम पाटील यांना बोलावून घेतले.
पाटील यांनी दिलगिरी व्यक्त करीत मैदान स्वच्छ करून देण्याची जबाबदारी स्वीकारली. तसेच नगरसेवक देशमुख यांनी मैदान महापालिकेच्या कर्मचाऱ्यांकडून स्वच्छता करण्याचे आश्वासन दिल्याने नागरिक शांत झाले. त्यानंतर कोल्हापूर व पुण्याकडे जाणाऱ्या बसेस सोडण्यात आल्या. कर्मचाऱ्यांच्या या वर्तणुकीचा मनस्ताप कोल्हापूरच्या नागरिकांना सहन करावा लागला.