कोल्हापूर : मोफत प्रवास पासाची मुदत जानेवारी ते डिसेंबर अशी असावी, सेवापुस्तक व रजा पुस्तकाची नक्कलप्रत मिळावी, सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांची प्रलंबित देणी ताबडतोब द्यावीत, यांसह अन्य प्रलंबित मागण्यांसाठी राज्य परिवहन निवृत्त कर्मचारी संघटनेच्या कोल्हापूर विभागाच्या वतीने विभागीय कार्यालयासमोर गुरुवारी एकदिवसीय धरणे आंदोलन केले. संघटनेतर्फे मागण्यांचे निवेदन विभाग नियंत्रक रोहन पलंगे यांना देण्यात आले.यावेळी बोलताना संघटनेचे सचिव बाबा कोकणे म्हणाले, राज्य परिवहन निवृत्त कर्मचाऱ्यांचे विभागीय व राज्य पातळ्यांवर अनेक प्रश्न प्रलंबित आहेत. याबाबत वारंवार पाठपुरावा, पत्रव्यवहार करूनही प्रश्न काही सुटले नाहीत. त्यामुळे प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी आम्ही एकदिवसीय धरणे आंदोलन करीत आहोत.आंदोलनस्थळी विविध एस. टी. संघटनांचे पदाधिकारी यांनी भेट देऊन पाठिंबा जाहीर केला. आंदोलनात अध्यक्ष कमलाकर रोटे, कार्याध्यक्ष इमान राऊत, अरविंद मोरे यांच्यासह सेवानिवृत्त कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.